व्याख्याते वैभव कुलकर्णी : शिवस्मारकच्या हिंदूसाम्राज्य दिन व्याख्यानमालेचा समारोप
सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचे राज्य स्थापले. हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी श्री शिवछत्रपतींच्या मार्गाचीच गरज आहे, असे प्रतिपादन व्याख्याते वैभव कुलकर्णी यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ (शिवस्मारक) तर्फे हिंदूसाम्राज्य दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचा समारोप गोविंदश्री मंगल कार्यालय सभागृहात रविवारी झाला. ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्थापलेले हिंदूसाम्राज्य’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद् घाटन ए. जी. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष सिध्देश्वर पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर उपस्थित होते.
व्याख्याते वैभव कुलकर्णी म्हणाले, इतिहास हा आपला आत्मा आहे. इतिहासाकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. हिंदूंचा इतिहास हा देशाची ओळख आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज हिंदू जनतेला आधार देण्यासाठी ३२ मण सुवर्ण सिंहासनावर आरूढ झाले. मात्र त्यानंतरच्या काळात त्यांची परंपरा विसरलेल्या समाजाला स्वधर्म, स्वदेशाचा विसर पडल्यामुळे देशाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पराभव झाला. देव, देश, धर्मावर आघात झाला तर जशास तसे उत्तर देण्याची धमक छत्रपती श्री शिवरायांमध्ये होती. ती धमक आपल्यात निर्माण होणे यातच श्री शिवछत्रपतींना अपेक्षित असलेल्या हिंदूसाम्राज्य दिनाचे यश आहे, असेही श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने, कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, संचालक प्रा. देवानंद चिलवंत, प्रसाद जिरांकलगीकर, संचालिका माधवी कुलकर्णी, व्यवस्थापक मल्लिनाथ होटकर यांची प्रमुख उपस्थित होती.
शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी प्रास्ताविक केले. संचालक प्रसाद जिरांकलगीकर यांनी परिचय करुन दिला. संचालिका माधवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.