MH13NEWS Network
सोलापूर (प्रतिनिधी) — सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे यांच्या खूनप्रकरणात माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, त्यांचे पुत्र प्रसेनजीत (उर्फ लकी) गायकवाड आणि हर्षजीत गायकवाड यांचे नियमित जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी फेटाळले.
उर्वरित चार आरोपी संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे आणि समरसेनजीत गायकवाड यांच्याबाबतचा जामीन आदेश २० सप्टेंबर २०२५ रोजी घोषित होणार आहे.
घटनेचा तपशील असा की..
१ जानेवारी २०२५ रोजी रात्री साडेबारा वाजता सिध्दार्थ हौसिंग सोसायटीतील काही जण भीमा कोरेगाव येथे शौर्य दिन साजरा करून परत आले होते. त्यावेळी बुद्धविहाराजवळ आरोपी आपल्या कुटुंबासह थांबले होते.
तेव्हा सनी निकंबे हा दारूच्या नशेत पिडीत महिलेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. यास रितेश गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता, प्रमोद गायकवाड यांनी “गाडीतील रॉड काढून या, या लोकांना माज आला आहे!” असे ओरडत सर्वांना बोलावून घेतले.
यानंतर सर्व आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दंडुक्यांनी पिडीत महिला आणि इतर साक्षीदारांना बेदम मारहाण केली.
त्यावेळी वैभव वाघे (उर्फ बंटी) भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत असताना, समरसेनजीत (उर्फ टिपू) गायकवाड याने त्याला अडवून पाडले आणि फरशी उचलून त्याच्या डोक्यात घातली. नंतर सर्व आरोपींनी मिळून त्याच्यावर लोखंडी रॉड व लाकडी दंडुक्यांनी अमानुष मारहाण केली.

गंभीर जखमी झालेला वैभव वाघे यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले,मात्र ६ जानेवारी २०२५ रोजी त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणात सदरबाजार पोलिस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
सुनावणीदरम्यान मुळ फिर्यादीतर्फे ॲड. संतोष वि. न्हावकर यांनी फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपींविरुद्ध यापूर्वीचे गुन्हे निदर्शनास आणत जामीनास विरोध दर्शवला.
सरकार पक्षातर्फे ॲड. दत्तूसिंग पवार यांनी सांगितले की आरोपींनी संगनमताने कट रचून, स्वकृतदर्शनी पुराव्यासह खून केला असून त्यांना जामीन देणे योग्य ठरणार नाही.हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने प्रमोद गायकवाड व त्यांच्या दोन्ही मुलांचा जामीन अर्ज फेटाळला, तर उर्वरित चार आरोपींच्या जामीनावरचा आदेश राखून ठेवला.
या खटल्यात मुळ फिर्यादीतर्फे : ॲड. संतोष वि. न्हावकर, ॲड. राहुल रुपनर सरकार पक्षातर्फे : ॲड. दत्तूसिंग पवार आरोपीतर्फे : ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. राज पाटील, ॲड. किरण सराटे यांनी काम पाहिले.








