MH 13 News Network
अतिरुद्र स्वाहाकारात अर्पण करणार २४ लाख ७४ हजार हवीर द्रव्यांच्या आहुत्या
सोमवारपासून रुद्राची १४ हजार ६४१ आवर्तने : श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचा उपक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठातर्फे श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजींच्या सुवर्ण महोत्सवी समाधी वर्षानिमित्त २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान आयोजित अतिरुद्र स्वाहाकारात हवीर द्रव्यांच्या २४ लाख ७४ हजार ३२९ आहुत्या अर्पण केल्या जाणार आहेत. या दरम्यान १२१ पुरोहितांकडून रुद्राची तब्बल १४ हजार ६४१ आवर्तने होणार आहेत, अशी माहिती मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांनी दिली.
विश्वशांती व धर्मजागृतीसाठी श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे ७ दिवसांचा महाकल्याणकारी अतिरुद्र स्वाहाकार विमानतळा पाठीमागील कस्तुरबा नगर येथील मठात करण्यात येत आहे. तूप, समिधा, काळे तीळ, साळी, सातू, लाकूड, तीळ आदी हवीर द्रव्यांच्या आहुती अर्पित केल्या जाणार आहेत. यात श्री अतिरुद्र मंत्राने अभिमंत्रित ११ हजार रुद्राक्ष वाटप, गोशाळा भूमिपूजन, मातृशक्ती पुरस्कार, आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, बसवज्योती पुरस्कार, धर्मसभा आधी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रुद्राभिषेक, भस्मार्चन, बिल्वपत्रार्चन, हवन, श्री शिवपुराण, प्रवचन, अष्टावधान सेवा, मंत्रपुष्प, महामंगलारती होणार आहे. अतिरुद्र स्वाहाकाराच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांसाठी दररोज महाप्रसाद वितरणही होणार आहे. अतिरुद्र स्वाहाकार व रुद्राभिषेकासाठी नाव नोंदणी सुरू असून श्रीशैल जम्मा (८४८५८३०६४४) किंवा प्रसाद उल्लागड्डे (९०२१५२९९७०) यांच्याशी संपर्क साधावा.
दरम्यान अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त रविवारी शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ होणार असून श्री आजोबा गणपती मंदिरापर्यंत ही मिरवणूक जाईल. यानंतर वाहनांनी मिरवणुकीत सहभागी भाविक नई जिंदगीपर्यंत जाणार असून येथील सितारा चौक ते श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत आणि अतिरुद्र स्वाहाकारात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मठाचे संस्थापक श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांनी केले आहे.
————–
दररोज होणार कुंकूमार्चन
अतिरुद्र स्वाहाकारादरम्यान २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत कुंकूमार्चन करण्यात येणार आहे. याकरिता भाविकांसाठी ५ क्विंटल कुंकू आणण्यात आले आहे. कुंकुमार्चन आणि महाप्रसादासाठी महिला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.