अमीर खान खून प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
सोलापूर / प्रतिनिधी
दि. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी विजापूर नाका येथील मशीद जवळ अमीर खान पठाण याचा लाकडी दांडक्याने डोक्यात मारून खून केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सागर मोहन चंदनशिवे (रा. सोलापूर) यास मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
प्रकरणानुसार, आरोपी सागर याची नोकरी अमीर खान याने मालकाकडे खोट्या तक्रारी करत संपवली, या कारणातून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते.

घटनेच्या दिवशी, मृत अमीर खान हा दारूच्या नशेत असताना आरोपी सागर याने त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी सागर याला अटक केली होती.

सोलापूर सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
असा केला युक्तिवाद..!
सुनावणीदरम्यान ॲड. माने यांनी युक्तिवाद केला की, “तथाकथित नेत्रसाक्षीदार राजेंद्र गायकवाड याने पोलीस स्टेशन जवळ असूनही चार दिवस घटनेबाबत काहीही माहिती दिली नाही, त्यामुळे त्याच्या जबाबावर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते.”सरकारतर्फे ॲड. एस. एस. चौधरी यांनी काम पाहिले.