सरकारी कामात अडथळा प्रकरणी, सहा जणांची निर्दोष मुक्तता
सोलापूर : कोरोना काळात रुग्णाच्या रिपीट टेस्टच्या मागणीवरून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वाद घालून रजिस्टर व कागदपत्रे फेकून दिल्याचा आरोप करण्यात आलेल्या प्रकरणात सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. वाय. ए. राणे यांनी सहा आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.
या प्रकरणातील भाजप युवा नेते आनंद तानाजी भवर यांच्यासह सौ. लक्ष्मी बाबू भवर, अलका आनंद भवर, कल्पना तुकाराम भोगे, शोभा निलकंठ पांढरे, श्रद्धा स्वप्नील जाधव(सर्व रा. बाळे, सोलापूर) या सर्वांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
घटनेचा मागोवा:
दिनांक १२ जून २०२१ रोजी सदर घटनेतील संशयित आरोपी आनंद भवर यांचे ओळखीचे अभिजीत जाधव यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यावरून आनंद भवर यांनी रिपीट टेस्टची मागणी केली असता त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तसे करण्यास नकार दिला.

यावरून तेथे वाद झाला व आरोपीने रजिस्टर व कागदपत्रे फेकून दिल्याचा आरोप आहे. याचप्रसंगी उर्वरित महिला आरोपींनी “भविष्याचे नगरसेवक आहेत” असे म्हणून डॉक्टरांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याचे नमूद करण्यात आले.

या प्रकरणी डॉक्टरांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३५३, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम २०१० अंतर्गत कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला होता.
प्रकरणात सरकार पक्षातर्फे दोन डॉक्टर व तपासी अंमलदारांसह साक्षी नोंदविण्यात आली. मात्र, बचाव पक्षाचे वकील अॅड. एम. ए. इनामदार यांनी साक्षीदारांच्या साक्षींतील विसंगती निदर्शनास आणून दिल्या. त्यासोबतच त्यांनी उच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखला देत युक्तिवाद मांडला.
न्यायालयाने तो युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.या खटल्यात आरोपींच्या वतीने अॅड. एम. ए. इनामदार आणि अॅड. वसीम डोंगरी यांनी काम पाहिले.