महसूलमंत्र्यांकडून शाबासकीची थाप…
छत्रपती संभाजीनगर, दि. 4 ऑगस्ट – छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. तर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा करत शाबासकीची थाप दिली.
२ व ३ ऑगस्ट रोजी नागपूर येथे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना आपल्या जिल्ह्यातील विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
या वेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना थेट भेटी देत संवाद साधला. शिक्षकांशीही शैक्षणिक गुणवत्तेविषयी चर्चा केली.
तसेच, शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आधुनिक शेती पद्धतींबाबत माहिती दिली.याशिवाय, शासकीय जमिनींचे संरक्षण व्हावे यासाठी ‘लॅन्ड बँक’ या नावाने त्यांनी एक अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे सरकारी जमिनींची नोंदणी, वापर आणि देखरेख अधिक प्रभावीपणे केली जात आहे.

राज्यस्तरावरील प्रशासकीय व्यासपीठावर जिल्हाधिकारी स्वामी यांच्या उपक्रमांना मिळालेली ही दाद, इतर जिल्हाधिकाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे.