सोलापूर | दि. ८ ऑगस्ट – सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या फिल्मी स्टाइल अपहरण प्रकरणात पोलिसांनी अवघ्या चार तासांत पीडिताची सुटका करून चार आरोपींना लोखंडी हत्यारे आणि पांढरी टोयोटा कारसह ताब्यात घेतले. जुना वैमनस्यातून ही धाडसी घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
घटनेचा तपशील
दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता विष्णु शिवराय हांडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांचा भाऊ शरणु शिवराय हांडे (३६, रा. साई नगर, अक्कलकोट रोड) यांचे समाधाननगर रोडवरील राज बिअर शॉपीच्या मागून ५ ते ६ जणांनी पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अपहरण केले आहे.

तक्रार मिळताच पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू करत चार स्वतंत्र पथके तयार केली. घटनास्थळी हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून आरोपी आणि वाहनाचे वर्णन मिळाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले तसेच तांत्रिक तपासाद्वारे वाहन कोणत्या दिशेने गेले याचा शोध घेण्यात आला.
तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला.

अखेर कर्नाटकातील विजयपूर – सोलापूर महामार्गावरील होर्ती गावाजवळील उड्डाणपुलाजवळ आरोपी आणि पीडित यांना अडवण्यात यश आले. पोलिसांनी शरणु हांडे यांची सुखरूप सुटका केली आणि अपहरणासाठी वापरलेली टोयोटा कार (क्र. MH12XX6547) ताब्यात घेतली.
अटकेत आरोपी
1. अमित म्हाळप्पा सुरवसे (२९, रा. मणिधारी सोसायटी, अक्कलकोट रोड, सोलापूर)
2. सुनिल भिमाशंकर पुजारी (२०, रा. साईबाबा चौक, सोलापूर)
3. दिपक जयराम मेश्राम (२३, रा. आशा नगर, सोलापूर)
4. अभिषेक गणेश माने (२३, रा. एकता नगर, सोलापूर)
त्यांच्याकडून लोखंडी हत्यारे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचे उघड झाले आहे.गुन्हा दाखलसदर प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६९५/२०२५ भा.दं.वि. कलम १४०(१), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९० सह शस्त्र कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कारवाईत सहभागी अधिकारीही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परि.) विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष) अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (वि.१) सुधीर खिरडकर, वपोनि प्रमोद वाघमारे, वोनि सुनिल दोरगे, पोनि विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि भरत चंदनशिव, सपोनि शंकर धायगुडे, पोउपनि महेंद्र गाढवे, पोहेकॉ सचिन भांगे, पोना मंगेश गायकवाड, पोकॉ शैलेश स्वामी, अमोल यादव, अमसिद्ध निंबाळ, सुहास अर्जुन, शंकर याळगी, कुमार बोल्ली, अमर शिवसिंगवाले, किशोर व्हनगुंटी, अविनाश डिगोळे, सकलेन मुकादम, तसेच गुन्हे शाखेतील अंकुश भोसले, शैलेश बुगड, काशिनाथ वाघे, अभिजतीत धायगुडे, राजकुमार वाघमारे यांनी मोलाचा वाटा उचलला.