सोलापूर – मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
राज्य सरकारकडून व्हायबिलिटी गॅप फंडिंगला हिरवा कंदील
सोलापूर, /प्रतिनिधी –
सोलापूरवासीयांसाठी एक दिलासादायक बातमी असून, बहुप्रतिक्षित सोलापूर – मुंबई विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर – पुणे – मुंबई विमानसेवेसाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे लवकरच विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पालकमंत्री जया भाऊ, युवा आमदार देवेंद्र दादा, अक्कलकोटचे सचिन दादा, यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळालेले आहे.
या निर्णयामागे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांचा सततचा पाठपुरावा आणि प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. याशिवाय, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही या विषयासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मागणी केली होती.

औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाची सेवा
सोलापुरातून थेट मुंबईसाठी विमानसेवा नसल्याने अनेक उद्योजक व व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. सोलापूरमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेले अनेक उद्योजक केवळ वाहतूक सुविधांच्या अभावामुळे मागे हटत होते. ही गरज ओळखून सरकारने विमानसेवा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला.
मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आमदार कोठे व कल्याणशेट्टी यांनी ही मागणी पुन्हा लावून धरली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकरच सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या आश्वासनाला मूर्त स्वरूप आले आहे.

⸻
काय आहे व्हायबिलिटी गॅप फंडिंग?
प्रवाशांच्या अभावामुळे विमानसेवा तोट्यात जाऊ नये म्हणून सरकार विमान कंपन्यांना प्रत्येक तिकिटामागे एक ठराविक आर्थिक भरपाई देते. यालाच व्हायबिलिटी गॅप फंडिंग असे म्हणतात. त्यामुळे विमानसेवा सुरू राहते आणि प्रवाशांनाही सातत्याने सेवा मिळते.
आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया:
“गेल्या अनेक दशकांपासून विकासापासून वंचित राहिलेले सोलापूर आता उद्योगजगताच्या नकाशावर येणार आहे. या निर्णयामुळे सोलापुरातील तरुणांना स्थानिक पातळीवरच संधी उपलब्ध होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूरकरांतर्फे आभार.*” – आमदार देवेंद्र कोठे
सोलापूर – मुंबई विमानसेवा ही केवळ एक प्रवासाची सुविधा न राहता, संपूर्ण सोलापूरच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा आधार ठरणार आहे. लवकरच सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा आता अधिक उत्साहाने होत आहे.
Devendra Fadnavis CMOMaharashtra
Kothe Devendra Rajesh Jaykumar Gore Sachin Kalyanshetti Devendra Rajesh Kothe Solapur Municipal Corporation, Solapur