“
सोलापूर /प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अभिमान आणि देशभक्तीचा उत्साह जागवणारा एक अनोखा सोहळा यंदाही सोलापूरमध्ये पाहायला मिळाला.
दरवर्षीप्रमाणे हरळी प्लॉट योगासन मंडळ, खंडक बाग सिद्धेश्वर मंदिर परिसर, सोलापूर यांच्या वतीने ७९ वा स्वातन्त्र्योत्तर दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्धतेने आणि परंपरेने साजरा करण्यात आला.हे मंडळ गेली तब्बल ४८ वर्षे सकाळी नेमक्या सात वाजता पावसाळा असो वा ऊन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला सलग झेंडावंदनाचा मान राखत आले आहे.

शहरात सर्वात पहिले झेंडा फडकवण्याचा मान या मंडळाला मिळतो.म्हणूनच, हा कार्यक्रम केवळ झेंडावंदनापुरता मर्यादित नसून, देशभक्तीची सातत्यपूर्ण परंपरा जपणारा प्रेरणादायी सोहळा ठरला आहे.यावर्षी झेंडावंदनाचा मान मंडळाचे ज्येष्ठ सहकारी श्री. गंगाधर वाघमारे यांच्या हस्ते पार पडला.

मंडळाचे सक्रिय सदस्य श्री. सुधीर गावडे यांनी ७५ वर्षे पूर्ण केलेल्या म्हणजेच १९५० साली जन्मलेल्या चार ज्येष्ठ सभासदांचा मोदी जॅकेट परिधान करून सत्कार केला. ज्येष्ठांचा हा सन्मान पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमान आणि आनंदाचे अश्रू दाटले.

कार्यक्रमात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सर्व उपस्थितांसाठी साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू अशा स्वादिष्ट आणि पारंपरिक अल्पोपहाराची मनोज्ञ मेजवानी देण्यात आली.
या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन आणि सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी मंडळाचे अध्यक्ष श्री. मोहन तुम्मा यांनी मनापासून पार पाडली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत, “हा केवळ उत्सव नाही, तर ऐक्य, परंपरा आणि ज्येष्ठांचा सन्मान जपणारा एक जीवंत आदर्श आहे” असे प्रतिपादन केले.
संपूर्ण परिसर देशभक्तीच्या गीतांनी, तिरंग्याच्या फडफडत्या रंगांनी आणि समाजातील ऐक्याच्या भावनेने भारावून गेला.हरळी प्लॉट योगासन मंडळाचा हा सलग ४८ वर्षांचा झेंडावंदन सोहळा आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.