MH 13 NEWS NETWORK
सोलापूर | क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या खेळाडूंसह मार्गदर्शक व संघटकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी साय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याला माजी क्रीडा संचालक डॉ. सुरेश पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व जिल्हा मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण मित्र गोत्रे तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मंजुश्री पाटील, योगाचार्य सौ. संगीता जाधव व्यासपीठावर मान्यवरांसोबत विराजमान होते.
आपल्या मनोगतात जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी सांगितले की, “राष्ट्राच्या प्रगतीसाठी सक्षम व सशक्त तरुणाई आवश्यक आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे.” तर डॉ. सुरेश पवार म्हणाले, “क्रीडा सरावात सातत्य ठेवले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणे अशक्य नाही.”
या कार्यक्रमात साईराज हनमे, श्रेया परदेशी, सिद्धार्थ साखरे, प्रेरणा हरिदास, रमेश दोडमणी, सोहेल पठाण, अक्षय हावळे, गौरी गुंड, श्रावणी सुपाते, अथर्व पोद्दार या खेळाडूंसह हरिदास रणदिवे (आर्चरी), दीपक चिकणे (आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक, आर्चरी), महेश झांबरे (टेनिस), सौ. संगीता जाधव (कराटे), डॉ. अशोक पाटील (मा. क्रीडा संचालक, सोलापूर विद्यापीठ), अनिल गिराम (आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच), मरगू जाधव (कबड्डी), गोकुळ यादव (खो-खो), प्रा. संतोष खेडे (बेसबॉल), सुहास छनचुरे (बॉल बॅडमिंटन), प्रा. प्रमोद चुंगे (टेनिस क्रिकेट) यांचा विशेष गौरव करण्यात आला.
प्रा. सचिन गायकवाड यांनी प्रस्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रा. युवराज सुरवसे यांनी केले. प्रा. संतोष गवळी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रा. सोनकांबळे, प्रा. शंभूदेव गावडे, प्रा. अश्विन नागणे, प्रा. गरड, प्रा. दिपाली साळुंखे, प्रा. सौ. पवार, प्रा. सौ. शिंदे, प्रा. गिरीश लोंढे, श्री. राजाभाऊ बंधुरे, श्री. शहाजी जाधव, श्री. डेंगळे, श्री. प्रकाश उडता, श्री. थिटे यांचे सहकार्य लाभले.