केंद्र सरकारच्या जीएसटीबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुलभ होईल – उपमुख्यमंत्री
mh 13 news network
मुंबई दि.५ : – केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जीएसटी स्लॅब १२ टक्के आणि २८ टक्के रद्द करून केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्याचा निर्णय तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. नवरात्रीपासून हे नवे दर लागू होतील. त्यामुळे सणासुदीच्या काळात जनतेला दिलासा मिळेल. सामान्य नागरिक, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि लघु, मध्यम उद्योजकांना या निर्णयामुळे फायदा होईल. या सुधारणांमुळे व्यापार सुलभ होईल, बाजारपेठेतील मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल. विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.