mh 13 news network
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मदतीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील अनेक लाभार्थींनी आपले स्वप्न साकार केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत महामंडळाकडून 8 हजार 477 लाभार्थींना एकूण 83 कोटी 21 लाख रूपये व्याज परतावा रक्कम देण्यात आली. तर गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत महामंडळाकडून 201 लाभार्थींना एकूण 6 कोटी 81 लाख रूपये व्याज परतावा रक्कम देण्यात आली.
याबाबत महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील म्हणाल्या, सांगली जिल्ह्यात आतापर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत एकूण 11 हजार 473 एलओआय प्राप्त लाभार्थींपैकी 8 हजार 836 लाभार्थींना बँक कर्ज मंजूरी देऊन एकूण 861 कोटी 25 लाख रूपये कर्ज वितरीत करण्यात आले आहेत. यामध्ये महामंडळाकडून 8 हजार 477 लाभार्थींना एकूण 83 कोटी 21 लाख रूपये व्याज परतावा रक्कम देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
निशा पाटील म्हणाल्या, सांगली जिल्ह्यात आतापर्यंत गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत एकूण 339 एलओआय प्राप्त लाभार्थींपैकी 205 लाभार्थींना बँक कर्ज मंजुरी देऊन एकूण 49 कोटी 54 लाख रूपये कर्ज वितरीत करण्यात आले. यामध्ये महामंडळाकडून 201 लाभार्थींना एकूण 6 कोटी 81 लाख रूपये व्याज परतावा रक्कम देण्यात आली.

या योजनेच्या लाभार्थींच्या कथा प्रेरणादायी आहेत. संदीप पाटील यांनी त्यांच्या नावावर 30 लाख रूपयांहून अधिक देणे असताना त्यांनी 2011 साली सह्याद्रि आटा चक्की विक्री व्यवसायात उडी घेतली. सांगलीच्या गणपती पेठेत त्यांचे सह्याद्रि मशिनरी पॉईंट नावाने दुकान आहे. सह्याद्रि आटा चक्कीचे सांगली जिल्ह्यात 39 वितरक आहेत. 2011 ते 2018 पर्यंत या व्यवसायात स्थिरावल्यावर त्यांना नवीन काहीतरी करण्याचे वेध लागले. आज ते जवळपास किचनशी संबंधित 300 यंत्रे, वस्तू तयार व असेंबल करतात. हॉटेल किचन सेटअपमध्ये त्यांची स्पेशालिटी आहे.

याबाबत संदीप पाटील म्हणाले, सह्याद्रि आटा चक्की हा आमचा एकच ब्रँड जवळपास 8 वर्षे विकल्यानंतर मला व्यवसाय वाढवायचा होता. मात्र, मोठ्या भांडवलाअभावी मला ते करता येत नव्हते. अशातच मला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची माहिती मिळाली व त्याचा लाभ घेण्याची संधी मिळाली. या योजनेच्या माध्यमातून माझ्या कुटुंबाच्या असणाऱ्या दोन ते तीन फर्मसाठी मला कर्ज मिळाले. दहा लाख रूपयांचे कर्ज बिनव्याजी मिळाले. त्यातून माझ्या व्यवसायाला उभारी मिळाली. एका मशिनवरून आज 300 मशिनरींची विक्री करतो. यामध्ये महिलांना व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू, हॉटेल किचनसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तुंची विक्री करतो, असे सांगून त्यांनी महामंडळाचे मनापासून आभार व्यक्त केले.

या योजनेचे आणखी एक लाभार्थी किशोर तानाजी साळुंखे यांचे स्वराज्य फूड प्रॉडक्ट्स् नावाने लाकडी घाण्यावर तेल बनविण्याचे युनिट आहे. लाकडी घाण्यावर शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, बदाम, मोहरी, तीळ, जवस अशा वेगवेगळ्या प्रकारची तेले ते काढतात. सांगलीसह पुणे, मुंबई, दिल्ली व बंगळुरूपर्यंत त्यांच्या उत्पादनांची विक्री केली जातात.
ते म्हणाले, स्वराज्य फूड प्रॉडक्ट्स् हे युनिट मी 2018 साली चालू केले. व्यवसाय सुरू करण्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज होती. ती मदत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून मिळाली. मला व्यवसायासाठी 10 लाख रूपयांचे कर्ज मिळाले. पाच लाख रूपयांच्या मशिन्स घेतल्या व उर्वरित पाच लाख रूपयांचे खेळते भांडवल म्हणून रोख पत (सी.सी) कर्ज मिळाले. त्यासाठी मला कोणतेही तारण द्यायला लागले नाही. 2024 पर्यंत मी सर्व कर्ज फेडले. त्याचा वेळेत व्याजपरतावा मिळाला. त्यामुळे व्यवसायात आज मी स्वयंपूर्ण झालो आहे.

स्वाती गिड्डे यांचे जिजा लेडिज कलेक्शन या नावाने सांगली येथे महिलांचे कपडे व अन्य वस्तू विक्रीचे दुकान आहे. याबाबत त्या म्हणाल्या, दहा वर्षांपासून मी कपडे विक्रीचा व्यवसाय करते. माझ्या मनात हा व्यवसाय वाढवण्याची इच्छा होती. त्यासाठी काही मार्ग सापडतो का, या दृष्टीने प्रयत्न करत असताना मला अण्णासाहेब पाटील महामंडळाबद्दल माहिती मिळाली. व्यवसायाच्या दैनंदिन उलाढालीसाठी मला व्याजपरतावा योजनेतून 10 लाख रूपयांचे रोख पत (सी.सी) कर्ज मिळाले. त्यामुळे मला व्यवसायवाढीसाठी मदत झाली आहे. त्यासाठी मी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे आभार मानते.
एकूणच रोजगाराची वाट न पाहता रोजगार निर्माण करण्याचा मंत्र या महामंडळाने तरुणांना दिला आहे. या योजनेमुळे केवळ रोजगार नव्हे, तर उद्योजकतेचा आत्मविश्वास युवकांमध्ये निर्माण झाला आहे.