MH 13 NEWS NETWORK
सोलापूर-पुणे महामार्गावरील जुना पुना नाका सर्व्हिस रोडजवळील ब्रिजवर आज, शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साधारण साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका 67 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव श्रीकांत मारुती काळे (वय 67, रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर) असे आहे.
प्राथमिक माहितीनुसार, श्रीकांत काळे यांनी ब्रिजवरील लोखंडी संरक्षक कठड्याला साडीच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात अर्थात (सिव्हिल हॉस्पिटल) येथे पाठवण्यात आला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत काळे हे काल, दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.