सोलापूर :श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर यांची सन २०२४-२५ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार 27 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सहकार महर्षी वि.गु. शिवदारे आण्णा सभागृह, सिद्धेश्वर बाजारपेठ, सोलापूर येथे होणार आहे. या सभेत बाजार समितीच्या कामकाजासंबंधी महत्त्वाचे विषय, वार्षिक हिशोब व अहवाल सादर होणार असल्याने शेतकरी, व्यापारी व घटक संघटनांचे डोळे या बैठकीकडे लागले आहेत.
असे असतील सभेपुढील विषय…
मागील वार्षिक सभेचा सभावृत्तांत वाचून कायम करणेसन २०२४-२५ या वर्षाचा जमाखर्च व ताळेबंदाची माहिती सादर करणेवार्षिक अहवाल व लेखापरीक्षण अहवालावर चर्चातसेच अध्यक्षांच्या संमतीने आयत्या वेळी येणाऱ्या इतर विषयांची चर्चा सभेपुढे होणार आहे.
कुणाकुणाला नोटीस पाठवली?

या सभेच्या नोटीसीची प्रत मोठ्या प्रमाणावर विविध संस्थांना देण्यात आली आहे. त्यात –
👉 उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष,
👉 शहरातील वि.का. सोसायट्यांचे चेअरमन,
👉 ग्रामपंचायतींचे सरपंच,
👉 भुसार आडत व्यापारी संघ, ऑईल मिल, दाळ मिल, मिरची अडत, कॅन्व्हासिंग एजंट, बारदाना व्यापारी, कस्तुरबा मार्केट व्यापारी, टर्मिनल मार्केट फळभाजी संघटना इत्यादी व्यावसायिक संघटना,
👉 माथाडी कामगार संघटना, कामगार विकास मंडळ, विविध युनियन व तोलार संघटना.
याशिवाय ही नोटीस पणन संचालक पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर व उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर शहर यांनाही पाठविण्यात आली आहे.
उपस्थिती आवश्यक… अथवा..!

सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष किंवा प्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी सभेस उपस्थित राहणे बंधनकारक आहे. प्रतिनिधी पाठविणार असल्यास संस्थेचे अधिकृत पत्र सभेपूर्वी बाजार समितीकडे जमा करणे आवश्यक आहे, असे सूचित करण्यात आले आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांतून जाहीर प्रसिद्धी..
वार्षिक सभेबाबत सर्व घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी या नोटीसीची प्रत स्थानिक वृत्तपत्रांना देखील दिली असून, त्याद्वारे शेतकरी व व्यापारी वर्गाला वेळेवर माहिती मिळावी याची बाजार समितीने काळजी घेतली आहे. अशी माहिती श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव अतुलसिंह रजपूत यांनी दिली आहे.