सोलापुरात गुरुवारी राष्ट्रीय डाळिंब उत्पादकांचा मेळावा..
राष्ट्रीय डाळिंब दिनानिमित्त होणार अनार गौरव पुरस्काराचे वितरण
सोलापूर : येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय डाळिंब दिनानिमित्त आज गुरुवार, दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय डाळिंब उत्पादकांचा मेळावा आणि राष्ट्रीय डाळिंब दिनानिमित्त अनार गौरव पुरस्कार देऊन प्रगतीतील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे संचालक डॉ. राजीव मराठे हे भूषविणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मॅग्नेट, पुणेचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन संचालक अंकुश माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्र राज्य डाळिंब बागायतदार संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, कृषी विश्वविद्यालय धारवाडचे माजी कुलगुरू डॉ. विठ्ठल बेनागी, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सोलापूरचे शुक्राचार्य भोसले, कर्नाटक डाळिंब उत्पादक संघ बेंगलोरचे उपाध्यक्ष नागराज एस.एम. आदी मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रगतशील डाळिंब उत्पादक शहाजीराव जाचक आणि प्रतापराव काटे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
याप्रसंगी देशभरातून ३५० हून अधिक डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित राहून संवाद साधणार आहेत. या निमित्ताने डाळिंब शेतीत नाविन्यपूर्ण प्रगती साधणाऱ्या कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात राज्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच ‘अनार गौरव पुरस्कार’ देऊन प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहेत.या मेळाव्यास डाळिंब उत्पादक शेतकरी, संशोधक व भागधारक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ संग्राम धुमाळ यांनी केले आहे.
पुस्तक प्रदर्शन तसेच विविध तज्ज्ञांची चर्चासत्रे होणारया मेळाव्यात पहिल्या सत्रात डाळिंब संशोधन केंद्राच्या विविध माहिती पुस्तकांचे प्रदर्शन, डाळिंब संशोधन केंद्रावरील चित्रफितीचे अनावरण होणार आहे.
दुसऱ्या सत्रात डॉ. चंद्रकांत अवचारे यांचे उत्कृष्ट डाळिंब उत्पादन पद्धती, डॉ. सोमनाथ पोखरे यांचे डाळिंबातील सूत्र कृमी व्यवस्थापन- डॉ. सौमनाथ पोखरे, डॉ. मंजुनाथा एन. यांचे डाळिंब पीक संरक्षण तसेच डॉ. नीलेश गायकवाड यांचे डाळिंबातील मूल्य संवर्धन या विषयावर चर्चासत्र होणार आहे.