MH13NEWS Network
सोलापूर : शहरात आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून, वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.

पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संकटाच्या काळात सोलापूरातील अर्थ मिनरल वॉटर कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.दक्षिण सोलापुरातील हत्तुर परिसरामधील शिव रेणुका नगर येथे कंपनीतर्फे नागरिकांसाठी मोफत पिण्याचे मिनरल वॉटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या उपक्रमामध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक योगिनाथ चिडगुंपी यांनी पुढाकार घेतला आहे.पूरामुळे झालेल्या विद्युत पुरवठा खंडित परिस्थितीत जनरेटरच्या सहाय्याने पाणी फिल्टर करून नागरिकांना वितरित केले जात आहे.

“जोपर्यंत नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी मोफत दिले जाईल,” असे आश्वासन योगिनाथ चिडगुंपी यांनी दिले. येथील सर्वसामान्यांना माहिती व्हावे यासाठी त्यांनी गाव पातळीवर दवंडी देऊन मोफत मिनरल वॉटर देण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, अशा कठीण काळात उद्योग क्षेत्रातून मिळालेली मदत ही समाजासाठी दिलासा ठरणारी असल्याचे मत व्यक्त केले आहे.