MH13NEWS Network
सिद्धेश्वर बाजार समितीकडून पुरग्रस्तांना ५१ लाखांची मदत – सभापती दिलीपराव माने यांची घोषणा..
वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार..
सोलापूर :
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सिना नदीला आलेल्या ऐतिहासिक महापुरामुळे शेतजमिनी, पिके, घरे, संसारोपयोगी साहित्य यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पुरग्रस्तांना तब्बल ५१ लाखांची मदत साहित्यरूपाने करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती दिलीपराव माने यांनी केली.

सन २०२४-२५ या वर्षाची समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती माने यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.

उपसभापती सुनील कळके, संचालक राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, नागण्णा बनसोडे, प्रथमेश पाटील, श्रीशैल शिरोळे, सौ. इंदुमती पाटील, केदार विभुते, अविनाश मार्तंडे, सुभाष पाटोळे, रामप्पा चिवडशेट्टी, वैभव बरबडे, मुश्ताक चौधरी, गफ्फार चांदा यांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी श्री सिद्धेश्वर प्रतिमेची पूजा, आरती व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सचिव अतुल रजपूत यांनी सभेतील विषयांचे वाचन केले. सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. आभार संचालक प्रथमेश पाटील यांनी मानले.
या वेळी बोलताना सभापती दिलीप माने म्हणाले की, “सिद्धेश्वर बाजार समिती नेहमीच शेतकरीहिताचे धोरण जोपासते. सध्या महापुरामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड संकट आले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी समिती ५१ लाखांची मदत साहित्यरूपाने देऊन आपली सामाजिक जबाबदारी निभावणार आहे.”
सभेत राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या बैठकीस उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध सोसायट्या, ग्रामपंचायत सरपंच, चेअरमन, सदस्य तसेच संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.