MH13NEWS Network
जैन समाजाचे बाहुबली मंदिर व धानम्मा देवी मंदिरातील चोरी करणारे चोरटे १२ तासांत जेरबंद — सोलापूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
सोलापूर – विजापूर रोड परिसरातील जैन समाजाचे बाहुबली मंदिर तसेच धानम्मा देवी मंदिरातील चोरीचा तपास अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तीन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ८ पंचधातूच्या देवदेवतांच्या मूर्ती आणि रोकड ₹२,०००, असा एकूण ₹१,६५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
📍चोरीची घटना…
दि. ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.०० ते ०५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० या वेळेत विजापूर रोडवरील बाहुबली नगरमधील जैन समाजाचे बाहुबली मंदिर येथे अज्ञात चोरट्यांनी पंचधातूच्या मूर्ती आणि रोकड रक्कम असा ₹१,७३,०००/- किमतीचा माल चोरला होता.तसेच त्याच रात्री ११.०० ते ०५ ऑक्टोबर सकाळी ६.०० दरम्यान रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील धानम्मा देवी मंदिरातील दानपेटीतून ₹६,०००/- चोरीला गेले होते. या दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे व सदरबझार पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

📍गुन्हे शाखेची तपास मोहीम…
घटनांची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन तपास पथक तयार केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी तपासाची धुरा सांभाळली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून, पोलीस अंमलदार इम्रान जमादार व राजकुमार पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, चोरट्यांनी चोरी केलेल्या मूर्ती विक्रीसाठी मोदी रेल्वे बोगद्याजवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
यानंतर खेडकर यांच्या पथकाने सापळा रचून आकाश सुरेश पवार (२६, रा. नेहरू नगर, सोलापूर), अशपाक मौला शेख (२७, रा. थोरली इराण्णा वस्ती, विजापूर रोड) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी त्यांच्या साथीदार करण उर्फ करण्या केंगार (रा. दमाणी नगर, सोलापूर) याच्यासह दोन्ही मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.
📍मुद्देमाल जप्ती..
आरोपींकडून बाहुबली देव, पद्मावती देवी, आदिनाथ देव, पार्श्वनाथ देव, अनंतनाथ देव, शांतीनाथ देव आणि २४ तिर्थंकरांच्या पंचधातूच्या मूर्ती, तसेच ₹२,०००/- रोकड, असा एकूण ₹१,६५,०००/- किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
📍अधिकाऱ्यांचा सहभाग..
या संपूर्ण कारवाईत पुढील अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले –पोलीस आयुक्त –. श्री. एम. राजकुमार,उप-पोलीस आयुक्त (गुन्हे/वि.शा.) – डॉ. अश्विनी पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) – श्री. राजन माने,वरिष्ठ पोलीस निरीक्षक – श्री. अरविंद माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक – श्री. शैलेश खेडकर,तसेच त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार –संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, चालक बाळासाहेब काळे,तसेच सायबर पोलीस ठाण्यातील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी सहभाग घेतला.
गुन्हे शाखेच्या या वेगवान आणि नेमक्या कारवाईमुळे धार्मिक स्थळांवरील चोऱ्यांवर आळा बसणार असून सोलापूर पोलिसांची कार्यक्षमता व संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.