mh 13 news network
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 1200 कुटुंबांना साहित्य वाटप
सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बार्शी तालुक्यातील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या बार्शी शाखेने सामाजिक बांधिलकी जपत 1200 पूरग्रस्त कुटुंबांना भांडी, चादर, साड्या आदी साहित्याचे किट्स वाटप करून दिलासा दिला.

यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या मदतीचे वाटप करण्यात आले. या मदतीचे एकूण मूल्य सव्वा कोटी रुपये इतके असून, ही मदत केवळ साहित्यपुरती मर्यादित नसून नव्या आशेचा किरण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गोरे यांनी यावेळी केले.

बार्शी तालुक्यातील गौडगाव, वैराग आदी भागांत पुरामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री गोरे यांनी सप्टेंबर महिन्यात या भागांची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यांनी स्पष्ट ग्वाही दिली की, एकाही शेतकरी किंवा नागरिकाला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. पुरात मुलगा गमावलेल्या गौडगावातील शिरालकर कुटुंबाला तातडीने चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचे काम सुरू असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा कार्यरत आहे.
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तब्बल 1200 कुटुंबांना इतक्या मोठ्या प्रमाणात मदत करून इंडियन रेडक्रॉस सोसायटीने खूप कठीण काळात माणुसकी जोपासली आहे. ही मदत प्रभावित कुटुंबांना नव्या आशेचा किरण देणारी आहे.”
या कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ, डॉ. बी. वाय. यादव, डॉ. कराड, रमेश पाटील, महावीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती देताना सांगितले की, “रेडक्रॉस ही जागतिक पातळीवर आपत्तीग्रस्तांना मदत करणारी संस्था असून, बार्शी शाखेने यापूर्वीही अनेक आपत्तींमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. या अतिवृष्टीत त्वरित सर्वेक्षण करून मदत वाटपाचे नियोजन करण्यात आले.” संस्थेने वाटप केलेल्या किटमध्ये भांडी, चादर आणि साड्या यांचा समावेश असून, प्रभावित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळेल.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही कार्यक्रमात बोलताना अतिरिक्त मदतीची माहिती दिली. ते म्हणाले, “लवकरच बार्शी बाजार समितीकडून एक कोटी रुपयांची मदत देण्यात येईल. ही मदत शेतकरी आणि कुटुंबांना पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरेल.”








