MH13NEWS Network
सोलापूर (प्रतिनिधी) — वाहतूक पोलिसाशी झोंबाझोंबी करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात सोलापूर येथील सत्र न्यायालयाने माजी नगरसेवक नागेश लक्ष्मण ताकमोगे (रा. सोलापूर) यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
घटनेचा संदर्भ असा की, दिनांक २८ जून २०१६ रोजी फौजदार विश्वास भांबड हे शहर वाहतूक शाखेत कर्तव्यावर असताना बालाजी सरोवर समोरील ठिकाणी वाहतूक तपासणी करत होते. त्यावेळी काळ्या रंगाची, नंबर प्लेट नसलेली ऑडी कार त्यांनी अडवली.
वाहनाचे कागदपत्र तपासल्यानंतर, नंबर प्लेट न लावणे आणि कागदपत्र न बाळगणे या कारणावरून त्यांनी वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली.या कारवाईवर नाराज होऊन, त्या परिसरातील नगरसेवक नागेश ताकमोगे यांनी फौजदार भांबड यांना “माझ्या गाडीला पावती फाडतोस का?” असे म्हणत अर्वाच्य शिवीगाळ आणि झोंबाझोंबी केली, असा आरोप होता.
याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास पोलीस निरीक्षक ए. डी. फुगे यांनी पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने आरोपीस शिक्षा व्हावी, असा युक्तिवाद केला.

मात्र आरोपीतर्फे असा युक्तिवाद मांडण्यात आला की..
घटनेच्या ठिकाणी मोठी गर्दी असतानाही स्वतंत्र साक्षीदार नाहीत,साक्षीदारांच्या साक्षींत विसंगती आहेत,सीसीटीव्ही फुटेज सादर केलेले नाहीत,म्हणून आरोप सिद्ध होत नाही.सर्व पुरावे आणि साक्षींच्या तपशीलांचा अभ्यास करून सत्र न्यायालयाने निष्कर्ष काढला की, आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होत नाही, आणि त्यामुळे निर्दोष मुक्ततेचा निकाल दिला.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. पी. बी. लोंढे पाटील, ॲड. अभिषेक गुंड, ॲड. प्रसाद अग्निहोत्री, ॲड. आदित्य आदोने यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲड. दत्ता पवार यांनी बाजू मांडली.