ओ.. ताई…! महापालिका निवडणुकीत महिला राज.! – सोलापूरमध्ये अर्धी सत्ता ‘ताईंच्या’ नावावर..
📍 सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आजची सोडत म्हणजे अनेकांच्या राजकीय भविष्याचा ‘निर्णायक टप्पा’ ठरली आहे. आज (11 नोव्हेंबर) हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्तांनी प्रभाग आरक्षण जाहीर केली. आणि त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेत यंदा ‘महिला राज’ असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. लाडक्या बहिणींना गेल्या टर्म प्रमाणेच राजकारणात चांगली संधी मिळणार आहे.

जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार एकूण 102 पैकी तब्बल 51 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. यात अनुसूचित जातींसाठी 8, अनुसूचित जमातीसाठी 1, ओबीसी महिलांसाठी 14 आणि सर्वसाधारण महिलांसाठी 28 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. म्हणजे सत्तेचा अर्धा हिस्सा थेट महिला नेत्यांच्या हाती येणार आहे.

सोलापूर महापालिकेचे एकूण 26 प्रभाग असून यामध्ये एकूण 102 जागांवर निवडणूक होणार आहे.या निकालानंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ‘भावी नगरसेविका’ आता सरसावल्या आहेत.

प्रत्येक पक्षात ताईंच्या ‘तिकिटावर’ नवा उत्साह, नव्या गणितांची चर्चा रंगू लागली आहे.राजकारणात महिला नेतृत्वाची ताकद सिद्ध करण्याची ही मोठी संधी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत सोलापूरच्या राजकारणात अनेक नवीन महिला चेहरे आणि समीकरणे पाहायला मिळतील, यात शंका नाही.
#महापालिका_निवडणूक #सोलापूर #महिला_राज #SolapurPolitics #Election2025









