MH 13 NEWS NETWORK
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बॉलिवूडमधील कलाकार स्मशानभूमीवर पोहोचले आहेत .
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांचे कुटुंबीय विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत पोहोचले आहेत. नव्वदाव्या वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज (24 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता त्यांचं पार्थिव विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर आणण्यात आलं. देओल कुटुंबीयांसह स्मशानभूमीवर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खानसुद्धा पोहोचले आहेत.
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
वयाच्या 89 व्या वर्षीही ते चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर सक्रिय होते. ते अनेकदा निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करायचे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ते ट्रॅक्टर चालवताना, शेती करताना आणि चाहत्यांना आयुष्याचे धडे देताना विविध व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करायचे.








