लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 26 मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांची नोंदणी वाढावी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आणि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून 159- दिंडोशी मतदारसंघातील नियुक्त क्षेत्रीय अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला असे 700 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमात उपस्थित होते. विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विशेष समन्वय अधिकारी डॉ. दळवी यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने अंगणवाडी सेविकांना निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
डॉ. दळवी म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पेाहोचून आपण शिक्षण आणि आरोग्याचे काम करत आहात. या क्षेत्रातील मतदारांच्या निवडणूक संदर्भात समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सकारात्मकरित्या काम करावे.
नव मतदारांनी २४ एप्रिलपर्यंत नाव नोंदवावे
एक अंगणवाडी सेविका किमान २०० कुटुंबापर्यंत पाहोचते. तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी नवमतदारांना संकेतस्थळावर अथवा वोटर हेल्प लाईन मोबाईल ॲपच्या साहाय्याने २४ एप्रिल पर्यंत नाव नोंदविण्यास मदत करावी. अपंग अथवा ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या सुविधांची माहिती देणे. आपल्याला ज्या नागरी सुविधा हव्या आहेत त्यासाठी आपण आपला राष्ट्रीय हक्क बजावणे गरजेचे असून, कुणाच्याही मतप्रवाहात किंवा भावनांना बळी पडून विचार करु नये. मतदार तसेच आशा वर्कर, स्वच्छता कर्मचारी, अभिनेते, पोलीस शिपाई यांच्या सहाय्याने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित करावेत, असेही डॉ. दळवी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी विजयकुमार चौबे, निवडणूक नायब तहसीलदार स्मृती पुसदकर, ‘स्वीप’च्या अधिकारी संगीता शेळके, भास्कर तायडे आदी उपस्थित होते.