mh 13 news network
नवी दिल्ली / पुणे :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेले सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी व संघर्षातून घडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या जाण्याने राजकारणासह सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात प्रवेश करत राष्ट्रीय पातळीवर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. तसेच ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया (IOA) चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले.
पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून पुण्याला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात कलमाडी यांचा मोलाचा वाटा राहिला. क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.
राजकारणात मतभेद, संघर्ष आणि टीका अपरिहार्य असतानाही सुरेश कलमाडी यांनी लोकशाही मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून लोकांप्रती असलेली जबाबदारी आहे, ही भूमिका त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ठामपणे जपली. सार्वजनिक जीवनातील अनेक चढ-उतार असूनही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवला.
दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून त्यांनी देशाच्या समाजकारण, राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या कर्तृत्वाचा व नेतृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने देशातील राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.








