MH 13 NEWS NETWORK
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपासाठी निर्णायक ठरणारा राजकीय घटनाक्रम घडला असून जय मातादी प्रतिष्ठानचे प्रमुख तथा युवकांमध्ये प्रभाव असलेले नेते दिनेश घोडके यांनी भारतीय जनता पार्टीला उघड पाठिंबा जाहीर केल्याने शहरातील चार प्रभागांमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर घोडके यांनी निवडणुकीतून माघार घेत थेट भाजप उमेदवारांच्या प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
या घडामोडीनंतर प्रभाग क्रमांक १३ सोबतच ९, १२ आणि १८ या चारही प्रभागांमध्ये भाजपाच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. जय मातादी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिनेश घोडके यांनी सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून युवकांचे भक्कम संघटन उभे केले असून त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जनाधार या प्रभागांमध्ये आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळूनही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिनेश घोडके यांच्याशी सकारात्मक चर्चा करत आगामी काळात योग्य भूमिका घेण्याची हमी दिली. आमदार कोठे यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवत दिनेश घोडके यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत भाजपाच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला असून स्वतः प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे.
दिनेश घोडके यांच्या सूचनेनुसार जय मातादी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व घोडके मित्रपरिवार पूर्ण ताकदीने भाजप उमेदवारांच्या प्रचारात उतरल्याने विरोधकांवर दबाव वाढला आहे. या घोडके फॅक्टरमुळे भाजपने निवडणुकीच्या लढतीत निर्णायक आघाडी घेतल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.
दरम्यान, आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागावर बारकाईने लक्ष केंद्रित करत शतप्रतिशत भाजपमय शहर मध्य हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रचारयंत्रणा अधिक गतिमान केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने प्रारंभी नाराज असलेले भाजप कार्यकर्तेही आता जोमाने मैदानात उतरले असून भाजपाचा प्रचार चढत्या क्रमाने पुढे जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.








