mh 13 news network

पायाभूत सुविधा, उद्योग, नागरी सेवा आणि नियोजनबद्ध विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने झालेला विकास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले. मात्र सोलापूरला अद्याप असा सर्वांगीण विकास का मिळाला नाही, असा सवाल उपस्थित करत आता सोलापूरच्या नव्या विकासाची सुरुवात करण्याची वेळ आली असून पिंपरी-चिंचवडचे विकास मॉडेल सोलापुरात राबविण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


गांधी नगर येथील हेरिटेज येथे शुक्रवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी कृषीमंत्री व पक्षाचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री, प्रा. श्रीनिवास कोंडी, नजीब शेख, प्रमोद भोसले, आनंद मुस्तारे, मकबूल मोहोळकर, वसीम बुर्हाण, तौफिक शेख, चंद्रकांत दायमा, सुहास कदम, सुशील बंदपट्टे, चित्रा कदम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन खासदार सुनील तटकरे व मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक केले तर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत केले.

तटकरे पुढे म्हणाले की, सोलापूर शहरातील बंद पडलेली सिटीबस सेवा, प्रवासी सुविधा, तसेच रखडलेली रिंग रोडसारखी महत्त्वाची विकासकामे पूर्ण करायची असतील तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हाच एकमेव विश्वासार्ह पर्याय आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सोलापूरच्या विकासाचे नवे मॉडेल मांडण्यात आले असून पुढील पाच वर्षांत त्यातील सर्व मुद्दे पूर्ण करण्याची ग्वाही पक्षाने दिली आहे.

महायुती सरकारला साथ देण्याचा निर्णय हा केवळ राज्य आणि जनतेच्या विकासासाठीच घेतल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर सरकारने राबवलेल्या विविध योजनांमुळे विधानसभेला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला. सोलापूर शहर हे अजितदादांवर प्रेम करणारे असून ते विश्वासार्ह, कार्यक्षम आणि परिणामकारक नेतृत्व असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या मेळाव्यात मंत्री दत्तात्रय भरणे व रुपाली चाकणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे खासदार तटकरे यांनी स्वागत केले. आभार प्रदर्शन आनंद मुस्तारे यांनी केले.
Solapur Municipal Corporation, Solapur









