MH 13 NEWS NETWORK
श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२६ साठी प्रशासन सज्ज; भाविकांच्या सुरक्षितता व सुविधांवर भर – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर शहरात दिनांक १२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या श्री सिद्धेश्वर महायात्रेसाठी प्रशासन, सोलापूर महानगरपालिका व श्री सिद्धेश्वर मंदिर समितीने परस्पर समन्वयातून काम करून भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२६ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, विना पवार, शहर पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, इन्सिडेंट कमांडर तथा शहर अभियंता सारिका आकुलवार, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, मंदिर परिसर व होम मैदान संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असले पाहिजे. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे बसवावेत. महायात्रा कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभागाने कडक बंदोबस्त ठेवावा तसेच वाहतूक सुरळीत ठेवून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
स्टॉल, मनोरंजन साहित्याचे फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक
होम मैदान व मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या सर्व स्टॉल्स, व्यासपीठे व मनोरंजनासाठी असलेली साधनसामग्री यांचे फिटनेस सर्टिफिकेट शासकीय यंत्रणेकडून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक स्टॉलसाठी देण्यात येणाऱ्या वीज जोडणीची तपासणी विद्युत निरीक्षकांकडून करावी, असे निर्देश देण्यात आले.
अग्निशमन व आरोग्य व्यवस्था सज्ज
अग्निशमन दलाने मंदिर व होम मैदान परिसरात अग्निप्रतिबंधक साहित्य उपलब्ध ठेवावे तसेच स्टॉलधारकांना अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण द्यावे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य पथके, आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे, रुग्णवाहिका व आयसीयू सेंटर सज्ज ठेवावेत. कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधून कार्यवाही करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
फीचर फोन, बोटी व आपत्ती व्यवस्थापन

महायात्रा कालावधीत नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संपर्क तुटू नये यासाठी टू-जी सेवा असलेले फीचर फोन उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडील तीन बोटी साहित्य व मनुष्यबळासह मंदिर समितीकडे देण्यात येणार असून, यामुळे मंदिर परिसरातील तलावात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाची कडक नजर

अन्न व औषध प्रशासनाने तयार केलेल्या ९ पथकांमार्फत होम मैदान व शहरातील विविध भागांतील फुल व खाद्य स्टॉलची तपासणी केली जाणार असून, भेसळ आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महायात्रा यशस्वी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न

प्रारंभी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व इन्सिडेंट कमांडर सारिका आकुलवार यांनी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. पंच कमिटी सदस्यांनी मंदिर समितीकडून भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती सादर केली.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारी श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२६ सुरक्षित, सुव्यवस्थित व यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले









