MH 13 NEWS NETWORK
शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने पुण्य पावन झालेल्या सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर येथे यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला अक्षता सोहळा संमती कट्टा येथे मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला.

संमती कट्टा येथे दरवर्षी परंपरेनुसार राजदंड व कुंभार कन्या यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या मंगल सोहळ्याची सुरुवात पारंपरिक विधींनी झाली. प्रथम पालखी व योगदंडाचे संमती कट्ट्यावर आगमन झाले. त्यानंतर नंदीध्वजाचे आगमन झाल्याने परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.

यानंतर गंगापूजा व सुगडीपूजन विधी संपन्न झाले. धार्मिक परंपरेनुसार सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर अक्षता सोहळ्यास विधिवत सुरुवात करण्यात आली. अक्षतांचा वर्षाव होत असताना “जय सिध्देश्वर”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या पवित्र सोहळ्यास महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, श्री गौहर हसन, श्रीमती आश्विनी पाटील, श्री विजय कबाडे, मनपा आयुक्त आकुलवार, जगदगुरु डॉ. मल्लीकार्जुन महाचार्य स्वामी, माजी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, धर्मराज काडादी, मानकरी राजशेखर हिरेहब्बू व समस्त हिरेहब्बू परिवार, तसेच पंचकमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या अक्षता सोहळ्यासाठी शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. बाराबंदी वेश परिधान केलेले भक्तगण, पारंपरिक वाद्यांचे निनाद आणि भक्तीमय वातावरणामुळे सोहळ्याला विशेष शोभा आली.
परंपरा, श्रद्धा आणि उत्साह यांचा सुंदर संगम साधत श्री सिध्देश्वर यात्रेतील हा महत्त्वाचा अक्षता सोहळा भक्तिभावात व जल्लोषात संपन्न झाला








