मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष उभारणे शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे सोलापूर महानगरपालिकेचे आवाहन
सोलापूर — सोलापूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, स्थानिक परिस्थिती तसेच उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल फोन जमा करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारणे शक्य होणार नसल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतदारांनी मतदानासाठी येताना शक्यतो मोबाईल फोन सोबत आणू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एखाद्या अपरिहार्य कारणास्तव मतदार मोबाईल फोन सोबत आणल्यास, तो मोबाईल फोन मतदान केंद्राबाहेर सुरक्षित ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मतदाराची राहील. मोबाईल फोन हरवणे, चोरी होणे किंवा नुकसान होणे यासंदर्भात महानगरपालिका किंवा निवडणूक यंत्रणा कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही, याची मतदारांनी नोंद घ्यावी.
मतदारांनी नियमांचे काटेकोर पालन करून निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.







