मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरता, शूरतेचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात दाखल; शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
शिवछत्रपतींचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा – मुख्यमंत्री
सातारा, : शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचे, वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत, हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-19-at-5.35.39-PM.jpeg)
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवशस्त्रशौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. संग्रहालयात मान्यवरांनी पाहणी केली.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/1-3-1.jpeg)
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार सर्वश्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशनकुमार शर्मा, आंतरराष्ट्रीय व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे कार्यालय प्रमुख निकोलास मर्चंट, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, वृषालीराजे भोसले, पुरातत्व विभागाचे संचालक सुजितकुमार उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल आदी उपस्थित होते. यावेळी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग अशा चार टपाल तिकीटांचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/GS2WHLAaMAAW2Sv.jpg)
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा असून त्यांची शिकवण, तत्वे अंगिकारल्यास आयुष्याची लढाई आपण सहज जिंकू. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या, कर्तृत्वाच्या खुणा जिथं कुठं असतील तिथून त्या शिवप्रतापाच्या भूमीत पुन्हा आणल्या जातील. लंडनहून सातारा येथे आणण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या दर्शनातून त्यांच्या पराक्रमाचे दर्शन घडते. ही वाघनखे म्हणजे त्यांची वीरगाथा आहे. संघर्ष जेवढा मोठा तेवढे यश ही मोठे हे त्यांच्या जीवनातील विविध घटनांमधून दिसून येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-19-at-5.35.43-PM-1.jpeg)
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शिवरायांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य साकार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून समाजातील सर्व घटकांसाठी अनेक हिताचे निर्णय शासनाने घेतले आहेत. विविध योजना शासन राबवित असून त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गड-कोट किल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती हे काम करेल. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १५० कोटीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नूषा महाराणी ताराबाई यांच्या संगममाहूली येथील समाधीस्थळाचा जीणोद्धार राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/1-1-2.jpeg)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे होते. त्यांनी मुघल सत्तेला पराभूत करुन रयतेचे राज्य स्थापन केले. स्वराज्यावर चालून आलेले संकट अफजलखानाचा वध करताना त्यांनी ज्या वाघनखाचा उपयोग केला ती वाघनखे अनेक वर्ष लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली होती. ती वाघनखे साताऱ्यात संग्रहालयामध्ये शिवप्रेमींच्या दर्शनासाठी उपलब्ध झाल्याने प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडण्याची संधी मिळाली आहे. शिवरायांनी जातीभेद न करता रयतेचे राज्य प्रस्थापित केले. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील व्यक्ती ही वाघनखे पाहण्यासाठी येईल व त्यातून प्रेरणा घेईल. छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन राज्य शासन काम करत असून राज्यात अनेक विकासात्मक प्रकल्प, योजना सुरु आहेत. शेवटच्या घटकाचा विचार करत प्रत्येकाच्या उत्थानासाठी शासन काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-19-at-5.35.45-PM.jpeg)
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नवीन पिढीला इतिहास कळावा, यासाठी शिवछत्रपतींची वाघनखे प्रेरणादायी आहेत. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याचे सांगून यापुढेही विकासकामांच्या प्रस्तावांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राजगडच्या पायथ्याशी मौजे पाल ता. वेल्हा येथील राजमाता सईबाई स्मृतीस्थळ आराखड्याला 30 कोटींचा निधी, वडजल ता. जुन्नर येथील शिवनेरी संग्रहालयाला 300 कोटी, मौजे तुळापूर हवेली येथील छत्रपती संभाजी महाराज बलीदान स्थळाच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शिराळा सांगली येथे स्मारक, प्रतागपडच्या पायथ्याशी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी जागा निवडण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावर शिवराज्यभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. शिवनेरीच्या विकासासाठी देखील आराखडा तयार करुन निधी देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री सरदार मोलोजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या इंदापूर ऐतिहासिक गढीच्या संवर्धनासाठी 40 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-19-at-5.35.44-PM.jpeg)
शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन, संवर्धनाकरिता विशेष निधीची तरतूद केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या वेल्हा तालुक्याचे नाव आता राजगड करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रतापगड, रायगड, शिवनेरी, याबाबतच्या कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही. तरुण किल्ल्यांवर मद्यपान करता याबाबत अधिक कायदा कडक करण्यात येणार आहे.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-19-at-5.35.41-PM-1.jpeg)
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीचे जनक होते. छत्रपती शिवरायांच्या सर्व वस्तू अनमोल आहेत. त्यांची वाघनखे साताऱ्यात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी अभिमानाचा, गौरवाचा दिवस आहे. महाराष्ट्राचा इतिहास गौरवाने सांगणाऱ्या ज्या वस्तू लंडन अथवा अन्य देशाच्या वस्तूसंग्रहालयात असतील त्या वस्तू महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की , शासनाने महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिवराज्याभिषेक दिवस हा शासकीय कार्यक्रम साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. संसदभवनमध्ये शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालय दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 10 कोटी रुपये दिले. आयआयएम नागपूर येथेही शिवाजी महाराजांच्या राज्याची मॅनेजमेंट शिकवली जाणार आहे. त्यासाठी 5 कोटी रुपये दिले आहेत. आग्रा येथील दरबारात शिवजयंती गेल्या दोन वर्षापासून साजरी होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा, गड-किल्ल्यांवर मद्यप्राशन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-19-at-5.35.47-PM-2.jpeg)
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झालेली वाघनखे सातारा नगरीत येणे ही संपूर्ण जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे. हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट ज्या वाघनखांच्या माध्यमातून त्यांनी नष्ट केले ती वाघनखे प्रत्यक्ष पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ही वाघनखे सात महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये राहणार आहेत. याची तिकीटे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दिवसभरातून चार स्लॉट उपलब्ध आहेत. एकावेळी दोनशे लोक हे प्रदर्शन पाहू शकतील. प्रशासनाने यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. याचा सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-19-at-5.35.46-PM-2.jpeg)
यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करुन छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्याचा मान सातारा जिल्ह्याला दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानले.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, त्यांनी सर्वधर्मसमभाव शिकविला. त्यांचे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे व्हावे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा. शिवराज्यातील ठिकाणांचे सर्किट निर्माण करावे. कोणत्याही वादविवादाला वाव राहू नये यासाठी शासनाच्या वतीने अधिकृत शिवचरित्र प्रकाशित करावे. देशाला एकसंघ ठेवण्याची ताकद शिवचरित्रात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-19-at-5.35.40-PM-2.jpeg)
आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा या ठिकाणी आणणे हा जीवनातील भाग्याचा क्षण आहे. या माध्यमातून इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या वतीने वाघनख्यांबाबत निर्माण झालेले वादविवाद टाळण्याचे, अफवा न पसरविण्याचे आवाहनही केले. अजिंक्यतारा किल्ला दुर्लक्षित असून त्यांच्या संवर्धनासाठी पर्यटकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी वाढीव निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही केली.
![](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/07/1-2-1.jpeg)
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, श्री. पवार यांनी शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे यांनी केले तर सुजितकुमार उगले यांनी आभार मानले.