MH 13NEWS NETWORK
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटातून मीनल साठे यांना उमेदवारी मिळाली असून बारामती येथे साठे कुटुंबीयांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांची उपस्थिती होती.
मीनल साठे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु माजी आमदार धनाजी साठे, दादा साठे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांसोबत लावलेल्या फील्डिंगमुळे थेट अजित पवार यांनी पक्षाचे तिकीट आणि उमेदवारी दिली. त्यामुळे साठे यांची ताकद वाढली आहे.
मीनल साठे यांच्या प्रशासकीय आणि सामाजिक कार्यामुळे मोठा मताचा गठ्ठा त्यांच्याकडे आहे. त्यातच राष्ट्रवादी घड्याळाचे चिन्ह मिळाल्यामुळे मोठे बळ प्राप्त झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना साठे यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाची तालुक्यात मोठी चर्चा झाली होती.
माढा तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्हा परिषद गट, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आमदारकीमध्ये राष्ट्रवादीचा मोठा बोलबाला आहे. साठे परिवाराच्या चाणक्य नीतिमुळे मीनल साठे यांना उमेदवारी मिळाली असून मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे साठे यांचे पारडे जड झाल्याची चर्चा माढा मतदारसंघात रंगत आहे.
प्रचारासाठी ऊर्जा मिळाली..!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बारामती येथे भेट घेतली. अजितदादांनी माझ्यावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी विविध विषयांवर चर्चा देखील झाली. अजितदादांच्या भेटीमुळे आता प्रचार आणखी जोमाने करण्याची ऊर्जा मिळाली आहे.
ॲड.मीनल साठे, राष्ट्रवादी उमेदवार,
माढा मतदारसंघ