MH 13NEWS NETWORK
आई प्रतिष्ठानमुळे ४५० विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर फुलले हसू ;गरजू मुलींना कपडे, फराळ अन् दिवाळी साहित्याचे झाले वाटप
समाजातील अनाथ, एकलपालक असलेल्या, कष्टकऱ्यांच्या ४५० विद्यार्थिनींना दिवाळीसाठी नवे कपडे, फराळ आणि दिवाळी साहित्य देण्याचा कौस्तुकास्पद उपक्रम आई प्रतिष्ठानने राबविला.
पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात शनिवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर रेडिमेड गारमेंट असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक संजय कंदले, उद्योजक वैभव पाटील, प्रा. कल्पना जक्कल, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, विश्वस्त वसंत जाधव, निसर्गा डांगरे उपस्थित होते.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते व्याह्रति होम करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
प्रमुख पाहुणे रेडीमेड गारमेंट असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन म्हणाले, देशाच्या प्रगतीत स्त्रियांचा वाटा मोठा आहे. आई प्रतिष्ठानच्या अशा उपक्रमातून समाजाला प्रेरणा मिळत आहे. भारताचे भविष्य घडविण्याचे काम आई प्रतिष्ठान करीत आहे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन आगामी काळात उद्योजकांना प्रोत्साहित करून गरजू विद्यार्थिनींसाठी सामाजिक उपक्रम करण्याचा आमचा मानस आहे, असेही श्री. जैन यांनी याप्रसंगी सांगितले.
आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे म्हणाले, विद्यार्थिनींनी खूप शिकावे, स्वावलंबी बनावे आणि स्वतःची प्रगती करावी यासाठी आई प्रतिष्ठान असे उपक्रम राबवते. विडी कामगार, कष्टकऱ्यांच्या मुलींच्या प्रगतीसाठी आई प्रतिष्ठान सदैव कार्यरत राहील.
समाजाला घडविण्याचे काम आई करते. त्यामुळे त्या मातेचा आम्ही सन्मान करतो, असेही आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी याप्रसंगी सांगितले.यावेळी कुचन प्रशाला, सोनामाता प्रशाला लिमयेवाडी, मार्कंडेय हायस्कूल, सोनामाता प्रशाला रेल्वे लाईन, ह. दे. प्रशाला, सिद्धाराम म्हेत्रे प्रशाला, गेनसिद्ध प्रशाला, भू. म. पुल्ली कन्या प्रशाला या ८ शाळांमधील ४५० गरजू मुलींना कपडे, फराळ आणि दिवाळी साहित्य देण्यात आले.
आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले तर योगेश डांगरे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास आई प्रतिष्ठानचे खजिनदार राहुल डांगरे, प्रताप महावरकर, दादाराव चव्हाण, अविनाश शंकू, शुभम चिट्याल, विवेक नक्का आदी उपस्थित होते.