MH 13 NEWS NETWORK
सोलापूर,(प्रतिनिधी):- मानवी जीवन कल्याणासाठी आदी शंकराचार्यांचे जीवन कार्य महान आहे असे प्रतिपादन माणिकप्रभु पिठाचे श्री सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांनी केले. डॉ. राजीव दबडे आणि डॉ. माधुरी दबडे यांच्या कृष्णामाई हॉस्पिटलच्या वतीने आयोजित आदि शंकराचार्य यांच्या जयंती निमित्त रविवार दि. 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हिने वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.
आदि शंकराचार्यांनी भारत देशासह जगाच्या कल्याणासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य आणि जीवनशैली अवघ्या काही तासात सांगता येत नाही एवढे महान कार्य त्यांचे आहे. माणिक प्रभु संस्थान माणिकनगर पिठाचा आणि सोलापूरचा संबध गेल्या 200 वर्षापासूनचा आहे. माणिकप्रभु महाराज यांचे वास्तव्य सोलापूरमध्ये काही वर्षे राहिलेले आहे. असेही श्री सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांनी सांगितले. श्रीराम भुजंगप्रयात स्तोत्राचे वाचन करणारा स्वतःच श्रीराम होवून जातो. वेदाचा सार म्हणजेच श्रीराम भुजंगप्रयात स्तोत्र आहे. असेही सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांनी सांगितले. आदि शंकराचार्यांच्या सखोल योगदानावर प्रकाश टाकून श्रीराम भुजंग प्रयात स्तोत्र आणि एक श्लोकी या रचनावर त्यांनी प्रकाश टाकला. श्रीराम भुजंग प्रयात स्तोत्रातील शेवटच्या ओळीवर ज्ञानराज माणिकप्रभुंनी विशेष भर दिला ज्यामध्ये आदि शंकराचार्य आपल्या शिष्यांना प्रभु रामचंद्रासारखे होण्याची आकांक्षा बाळगण्यास प्रोत्साहित करतात. आत्म साक्षात्काराचे अंतिम उद्दिष्टावर प्रकाश टाकतात. हे व्याख्यान म्हणजे आध्यात्मिक समृध्द करणारे सत्र होते. उपस्थितांना आत्म शोध आणि अनुभुतीच्या प्रवासाला सुरूवात करण्यास उद्युक्त करणारे ठरले. प्रारंभी उपस्थितांकडून श्री सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. नंतर डॉ. माधुरी दबडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते आदि शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. राजीव दबडे आणि डॉ. माधुरी दबडे यांनी सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांचा सत्कार करून आर्शिवाद घेतला. नंतर डॉ. मेघा कमलापूरकर यांनी सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांचा परिचय करून दिला. नंतर वरद श्रीराम आणि वेदांग नाईक या दोन चिमुकल्या मुलांनी श्रीराम भुजंगप्रयात स्तोत्र म्हणून दाखवले त्यानंतर उपस्थितांनी एका सुरात या स्तोत्राचे वाचन केले. नंतर सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु यांनी आदि शंकराचार्य यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला रसिक श्रोते तसेच आदि शंकराचार्य भक्तांनी मोठी गर्दी केलेली होती.