MH13NEWS Network
सोलापूर | प्रतिनिधी
काही माणसं व्यवसाय करत नाहीत… ती परंपरा जगवतात. काही हात काम करत नाहीत… ते इतिहास घडवतात. सोलापूरच्या मातीत वाढलेले हस्तकला कलाकार अनंत हे असेच एक अवलिया व्यक्तिमत्त्व…
आपल्या कलेच्या बळावर त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात चांदीच्या मूर्ती, मुखवटे आणि धार्मिक अलंकारांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अनंत यांची ही वाटचाल तिसऱ्या पिढीची परंपरा आहे. केरळमधील एरणाकुलम येथून त्यांचे आजोबा दत्तात्रय केशव येरंकल्लू सोलापूरमध्ये आले आणि चांदीच्या हस्तकलेचा व्यवसाय सुरू केला. ‘रेखा आर्ट्स’ या नावाने त्यांनी दागिने, मुखवटे आणि धार्मिक कलाकुसरीची पायाभरणी केली. विशेष म्हणजे ‘मुघल-ए-आझम’सारख्या चित्रपटांसाठी सेट तयार करण्याचे कामही त्यांनी केले होते. वडील प्रकाश येरंकल्लू हे महापालिकेत अधिकारी असतानाही या कलेला हातभार लावत होते.
लहानपणापासूनच आजोबांच्या छत्रछायेत अनंत यांनी चांदीला आकार देण्याचे बारकावे शिकले. चित्रकलेची प्रचंड आवड, बारकाईची नजर आणि हातातली सफाई यामुळे त्यांनी शालेय जीवनातच वेगळी ओळख निर्माण केली. अवघ्या ११-१२ व्या वर्षी संत गजानन महाराजांचा चांदीचा मुखवटा तयार करण्याचा पराक्रम त्यांनी केला. तो मुखवटा आजही शेगाव येथे पाहायला मिळतो.
दयानंद महाविद्यालयातून शिक्षण घेत असताना व्यवसाय सुरूच ठेवत त्यांनी चित्रकला परीक्षा उत्तीर्ण केली आणि काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले. मात्र वाढत्या व्यवसायाची गरज आणि परंपरेची जबाबदारी ओळखून त्यांनी नोकरीचा सुरक्षित मार्ग सोडत पूर्णवेळ कलेलाच वाहून घेण्याचा धाडसी निर्णय घेतला.
आज देशभरातील मोठ्या मंदिरांमधून त्यांच्या कामाला मागणी आहे. अयोध्येतील राम मंदिर, सोलापूरातील प्रमुख गणेश मंडळे, मंगळवेढा तालीम, पाणीवेस तालीम, आजोबा गणपती, विविध नवरात्र मंडळे आणि अनेक धार्मिक स्थळांवरील चांदीच्या कलाकुसरीची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
विशेष म्हणजे, संत गजानन महाराजांचे आठ ते दहा मुखवटे त्यांनी परदेशात तयार करून पाठवले आहेत.डिजिटल युगात मशीनवर कामाचा वेग वाढला असला, तरी अनंत आजही ‘हँडमेड’ परंपरा जपत आहेत. त्यांच्यासाठी हे केवळ काम नाही, तर सेवा आहे. पहाटे स्नान करून देवदर्शन घेतल्याशिवाय मापे न घेणे, प्रत्येक काम श्रद्धेने पूर्ण करणे आणि योग्य मोबदल्यात सेवा देणे ही त्यांची कार्यपद्धती.व्यवसायात अनेक चढ-उतार आले, पण त्यांनी कधी हार मानली नाही.
साधेपणा, प्रामाणिकपणा आणि मैत्री जपणारा स्वभाव यामुळे ते ‘राजा माणूस’ म्हणून ओळखले जातात.आज मिळालेला ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025’ पुरस्कार हा केवळ त्यांच्या कलेचा नाही, तर जिद्द, परंपरा आणि निष्ठेचा सन्मान आहे.








