MH 13 NEWS NETWORK
निवडणूक आयोगासाठी निवडणूकांच्या काळात माध्यमे आयोगाचे कान आणि डोळे आहेत. माध्यमात पैसे किंवा वस्तूच्या मोबदल्यात (प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक्स) कोणतेही प्रसारीत किंवा प्रकाशित वृत्त यावर माध्यम संनियत्रंण चे विशेष लक्ष व नियत्रंण राहणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी राजकीय पक्ष प्रतिनिधी उमेदवार यांच्याकरिता आयोजित बैठकीदरम्यान माहिती दिली.
15 डिसेंबर 2025 पासून शहरांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याकरिता एकूण 3115 बॅनर फलक,101 झेंडे हे काढून टाकले आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन हे प्रत्येकाने करायचे असून, कोणताही पक्ष अथवा उमेदवार यांनी धार्मिक तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. प्रतिस्पर्ध्यांच्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्यात येऊ नये.
तसेच प्रार्थना स्थळाचा निवडणूक प्रचाराचे व्यासपीठ म्हणून वापर केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदर्श आचारसंहिता बाबत एकत्रित आदेशातील सर्व सूचना या सर्व उपस्थितांना देण्यात आल्या व आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आव्हान करण्यात आले. तसेच, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व सोशल मीडिया जसे की टीव्ही, रेडिओ, फेसबुक, इंस्टाग्राम ,ट्विटर इत्यादी यांचा वापर करून प्रचार करण्याबाबत कोणत्या दक्षता घ्याव्यात याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
सोलापूर महानगर पालिके करिता माननीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये पुढीलप्रमाणे समितीची रचना करण्यात आलेली आहे.
महानगरपालिका आयुक्त (अध्यक्ष)
पोलीस आयुक्त (सदस्य)
अतिरिक्त आयुक्त -1 ( सदस्य)
आचारसंहिता कक्ष प्रमुख (सदस्य)
जनसंपर्क अधिकारी म.न.पा सोलापूर (सदस्य सचिव)
नॉर्थकोट प्रशाला येथे सदर समितीचे व मीडिया कक्षाचे कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती आज रोजी सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी उमेदवार देण्यात आली. यामध्ये उमेदवारांनी प्रचार करीत असताना सदरील प्रचाराबाबतची पूर्व परवानगी व प्रमाणीकरण करणे शासनाच्या वतीने बंधनकारक करण्यात आलेले आहे. याबाबत ही माहिती देण्यात आली.








