mh 13 news network
सोलापूर — जिल्हा परिषद सोलापूर येथे आज राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. अभियानाचे नियोजन, अंमलबजावणी तसेच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेत आयोजित आढावा बैठकीत ग्रामविकास विभागाचे कामकाज, करसंकलन, ग्रामपंचायत स्तरावरील उपक्रम व अभियानाची प्रगती याची माहिती सादर करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्यासह अभियान कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सध्या जिल्ह्यात राज्यस्तरावरून विविध सेलिब्रिटी, किर्तनकार यांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून करवसुली व नियोजनाची चांगली अंमलबजावणी केल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष प्रशंसा केली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी समाजमाध्यमांचा वापर, ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) करून अभियानाची प्रगती स्पष्ट केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांच्यासह विभागप्रमुख व गटविकास अधिकारी प्रत्येक गावास भेट देत असून, अभियानातील कामांना गती देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
करसंकलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, लेखापरीक्षण अहवालातील त्रुटी पूर्तता अभियान, अकोला व गोपाळपूर येथील किर्तनकारांचे कार्यक्रम तसेच ५५ गावांमध्ये अतिरिक्त पाच ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी दिली.
यावेळी अभियान कक्षातील जनसंपर्क अधिकारी सचिन जाधव, अधिक्षक सुहास चेळेकर, कक्ष अधिकारी सिद्धाराम बोरूटे, अक्षय स्वामी, अधिक्षक आप्पा भोसले, अभिनव पाये आदी उपस्थित होते.








