पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन २०२२-२३ चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
नाशिक, – अटल भूजल योजना सध्या राज्यातील १३ जिल्ह्यांतील 1100 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येत्या काळात ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविली जावी, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांच्या वतीने नाशिकरोडच्या मित्रा संस्थेत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन २०२२-२३ चा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार भास्करराव भगरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर, अतिरिक्त संचालक डॉ. विजय पाखमोडे आदी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, ठिबक सिंचनामुळे पाण्याची ५० टक्के बचत होते. त्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर वाढला पाहिजे. गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटल्यास निश्चितच गावांच्या भूजल संपत्तीत वाढ होणार आहे. या योजनेसाठी गावांमध्ये लोकसहभाग वाढला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री. पाटील म्हणाले की, गावा-गावांमध्ये पाणी अडविणे ही काळाची गरज असून यातूनच शाश्वत पाण्याचे स्रोत निर्माण होणार आहेत. विहिरींचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. पाणी बचतीबाबत जागृती होणे आवश्यक आहे. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार या गावांच्या ‘पाणीदार पॅटर्न’चा अभ्यास राज्यातील गावांनी केला पाहिजे. पुढील काळात शेती हीच नोकरी समजून, तिला व्यावसायिकतेची जोड देण्यासाठी पाणी अडविणे आणि त्यानंतर काटकसरीने वापर करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, भूजलाची पाणी पातळी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी अटल भूजल योजनेसारख्या योजनांमध्ये सहभाग घेऊन पाणी पातळी वाढवावी. शासनाने नार-पार प्रकल्पास मंजुरी दिली आहे. यातून दुष्काळी भागात जलसमृद्धी होणार आहे. शासन ठिबक सिंचनासाठी अनुदान देत असते. यासाठी प्रलंबित असलेले अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पाण्याची पातळी कमी झालेल्या गावांना पाणी योजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. विकासकामांसाठी गावांनी राजकीय स्पर्धा बाजूला ठेवून काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. खंदारे म्हणाले, राज्यातील शेती तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना भूजलावर अवलंबून आहेत. त्यामुळे गावा-गावांमध्ये अटल भूजल योजनेसारख्या योजना राबविणे आवश्यक आहे. या योजनेच्या यशस्वितेसाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे. प्रास्ताविकात आयुक्त पवनीत कौर यांनी अटल भूजल योजनेची अंमलबजावणी व उपयुक्तता याबद्दल माहिती दिली.
यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने कऱ्हाटी ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपाली लोणकर, जरूड ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर मानकर, किरकसाल गावाचे माजी सरपंच अमोल काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अटल भूजल योजनेच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींच्या यशकथा सांगणाऱ्या दृश्यश्राव्य चित्रफितीही याप्रसंगी दाखविण्यात आल्या.
अशा आहेत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती:
‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगाव, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जालना, लातूर, धाराशीव, अमरावती, बुलढाणा व नागपूर या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार कऱ्हाटी (जि. पुणे, ता. बारामती), द्वितीय पुरस्कार जरूड (जि. अमरावती, ता. वरूड)
व तृतीय पुरस्कार किरकसाल (जि. सातारा, ता. माण) या ग्रामपंचायतींना देण्यात आला. यात अनुक्रमे १ कोटी, ५० लाख व ३० लाख अशा राज्यस्तरीय पुरस्काराच्या रकमेचा समावेश होता. जिल्हास्तरीय पुरस्कारात प्रथम पुरस्कार – ५० लाख, द्वितीय – ३० लाख व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार – २० लाख अशी बक्षिसांची रक्कम होती. जळगाव जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार सावखेडे (ता. रावेर), द्वितीय पुरस्कार उंदिरखेडे (ता. पारोळा) व तृतीय पुरस्कार खिरोदा (ता. रावेर), पुणे जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार कऱ्हाटी (ता. बारामती), द्वितीय सोनोरी व तृतीय चांबळी (रावेर), सातारा जिल्ह्यात प्रथम पुरस्कार किरकसाल (माण), द्वितीय निढळ व तृतीय मांडवे (खटाव), सांगली जिल्ह्यात प्रथम पुरस्कार नांगोळे, द्वितीय बोरगाव (कवठेमहांकाळ) व तृतीय वडगाव (तासगाव), सोलापूर जिल्ह्यात प्रथम पुरस्कार भेंड, द्वितीय लोढेंवाडी व तृतीय सोलंकरवाडी (माढा), नाशिक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार वडगावपिंगळा, द्वितीय दातली (सिन्नर) व तृतीय कनकापूर (देवळा), जालना जिल्ह्यात प्रथम पुरस्कार आंबा (परतूर), द्वितीय बोररांजणी व तृतीय हातडी (घनसावंगी), लातूर जिल्ह्यात प्रथम पुरस्कार हरगुंळ (लातूर), द्वितीय जाजनूर (निलंगा) व तृतीय वडवळ (चाकूर), धाराशीव जिल्ह्यात प्रथम पुरस्कार खेड (धाराशीव), द्वितीय खामसवाडी (धाराशीव) व तृतीय भगतवाडी (उमरगा), अमरावती जिल्ह्यात प्रथम पुरस्कार जरूड, द्वितीय झटामझरी (वरूड) व तृतीय अंबाडा (मोर्शी), बुलढाणा जिल्ह्यात प्रथम निपाणा, द्वितीय शेलगाव बाजार, तृतीय वरूड (मोताळा) व नागपूर जिल्ह्यात प्रथम खेडी गेवारगोंदी (नरखेडी), द्वितीय खुर्सापार (कटोल) व तृतीय डोर्ली भांडवलकर (कटोल) या गावांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कारांच्या माध्यमातून राज्यातील ३६ ग्रामपंचायतींना १३ कोटी ८० लाखांच्या पुरस्काराच्या रकमेचे वाटप करण्यात आले.