MH 13 News Network
सोलापूर शहरातील उत्तर भागातील बाळे या ठिकाणी असणारे राजेश्वरी नगर हे अनेक विकास कामापासून वंचित राहिले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून रस्ताच नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आता आमदार देशमुखांसह,माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख हे ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
बाळे भागातील गल्लीबोळात सुद्धा सिमेंट काँक्रीटचे रस्ते, ड्रेनेज, समाज मंदिरे निर्माण होण्यासाठी या भागातील आमदार विजयकुमार देशमुख यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. असे येथील नागरिकांचे म्हणणे असून गेल्या पंधरा वर्षापासून राजेश्वरी नगर हे रस्त्याच्या कामापासून वंचित आणि दुर्लक्षित का राहिले हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पावसाळ्यात नागरिकांची आणि वाहनधारकांची अक्षरशः घसरगुंडी होते. तर मध्यंतरी खडी टाकल्यामुळे या खडीवरून घसरून येथील नागरिक पडले आहेत. चालत जाणारे वृद्ध आणि शाळकरी मुलांना अक्षरशः कसरत करत चालत जावे लागते.
लोकसभा निवडणुकीच्या आधी राजेश्वरी नगर येथील रस्त्यासाठी आमदार देशमुख यांनी निधीची तरतूद केली. त्यानंतर वर्क ऑर्डर सुद्धा मंजूर करण्यात आली. विधानसभेच्या आमदारांच्या विकास कामांच्या यादीत येथील रस्त्याचा विशेष उल्लेख करण्यात आला होता.
लोकसभा झाली विधानसभा झाली पुन्हा विजयकुमार देशमुख हे आमदार पदी विराजमान झाले. या भागातील नागरिकांनी त्यांना मोठे मताधिक्य दिले. तरीही रस्ता पूर्ण न झाल्याने नागरिकांचे हाल सुरूच राहिले आहेत.

अखेरीस, आमदार पुत्र माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी या ठिकाणची सविस्तर माहिती घेतली. विकास कामास उशीर लागणार नाही, लवकरच काम सुरू होईल असेही त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
संबंधित ठेकेदाराला तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार विजयकुमार देशमुख यांनी सक्त शब्दामध्ये सूचना दिल्याने लवकरच काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार.!
आमदार निधी मधून राजेश्वरी नगर येथील रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. संबंधित अधिकाऱ्यांना आणि मक्तेदाराला या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. मध्यंतरी निधी वाटपात तांत्रिक अडचणी असल्यामुळे या कामास उशीर लागला होता. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये येथील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.
विजयकुमार देशमुख, आमदार