MH13NEWS Network
सोलापूर – सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांवरून पंढरपूर सत्र न्यायालयात सुरू असलेला माजी आमदार रमेश कदम यांच्यावरील खटला कोल्हापूर उच्च न्यायालयाने तात्पुरता थांबवला आहे. दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या पुनरवृत्ती अर्जावर प्राथमिक सुनावणी घेत न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी “खटला पुढे न चालवण्याचा” अंतरिम आदेश दिला.
प्रकरणाची पार्श्वभूमी..
20 जानेवारी 2015 रोजी रात्री 9 च्या सुमारास मोहोळ तालुक्यातील तारापूर येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा टिपर आणि जेसीबी पकडण्यात आले होते. या कारवाईसाठी परिमंडळ अधिकारी मोहम्मद हुसेन तांबोळी आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता, “तहसीलदार का नाही आले?” असा सवाल करत माजी आमदार रमेश कदम यांनी शिवीगाळ केली व पंचनामा त्यांच्या उपस्थितीतच करावा, असा आग्रह धरत सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद नोंदवण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. सत्र न्यायालयात खटला सुरू असताना कदम यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला.
त्यानंतर त्यांनी ॲड. रितेश थोबडे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात पुनरवृत्ती अर्ज दाखल केला.उच्च न्यायालयातील सुनावणीसुनावणीदरम्यान ॲड. रितेश थोबडे यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करून न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत सत्र न्यायालयाने खटला न चालवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम यांच्यातर्फे ॲड. रितेश थोबडे व ॲड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारी बाजूने ॲड. पी. एस. राणे यांनी काम पाहिले.








