MH13NEWS Network
बार्शी न्यायालयाचा निर्णय
जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी नोंदविला तीव्र विरोध
बार्शी | विशेष प्रतिनिधी
माजी सरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या तुळजाभवानी कला केंद्रातील नर्तकी पूजा देविदास गायकवाड हिचा जामीन अर्ज श्रीमती व्ही.एस. मलकलपत्ते-रेड्डी, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, बार्शी यांनी फेटाळून लावला आहे.प्रकरणाचा तपशील असा —गोविंद बर्गे (रा. लुखामसला, बीड) हे ठेकेदारी व्यवसाय करत होते.

कामानिमित्त त्यांची ओळख नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी झाली आणि ती पुढे प्रेमसंबंधात रूपांतरित झाली.पूजा गायकवाड हिने बर्गे यांच्याकडून विविध बहाण्यांनी महागडे मोबाईल, बुलेट, सोने, प्लॉट, घर बांधकामासाठी पैसे, तसेच नातेवाईकांच्या नावावर जमीन इत्यादी मिळविल्याचा आरोप आहे.
यानंतर गेवराई येथे बांधलेल्या बंगल्याबाबत तीने बर्गे यांच्यावर तगादा लावून तो स्वतःच्या नावावर करण्याची मागणी केली. कुटुंबीयांनी त्यास नकार दिल्यानंतर पूजा गायकवाड हिने बर्गे यांना ब्लॅकमेल करून, “बंगला व शेती माझ्या नावावर करा, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करीन” अशी धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद आहे.या सततच्या मानसिक, आर्थिक व भावनिक त्रासामुळे बर्गे यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केली.

त्यानंतर त्यांच्या मेव्हण्याने वैराग पोलिस ठाण्यात पूजा गायकवाडविरुद्ध गु.नों. क्र. 289/2025, भा.दं.सं. 108, 351(2) अन्वये गुन्हा नोंदविला.पूजा गायकवाडला 10 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून ती न्यायालयीन कोठडीत आहे.
तिच्या बाजूने दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.सरकार पक्षाचा युक्तिवाद:जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदीपसिंग मो. राजपूत यांनी न्यायालयात म्हटले की,“आरोपीनं प्रेमाचं नाटक करून आर्थिक लुबाडणूक केली असून, मानसिक व शारीरिक छळातून गोविंद बर्गे यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं.
अशा प्रकारच्या आरोपीला जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल.”न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन अर्ज फेटाळला.सरकार पक्षातर्फे डॉ. राजपूत यांनी तर आरोपीतर्फे अॅड. आर.डी. तारके यांनी बाजू मांडली.