MH13NEWS network
सोलापूर शहर भाजपामध्ये इच्छुक उमेदवारांची अक्षरशः रांग लागल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. आज दुपारी अडीच वाजेपर्यंत तब्बल १ हजार ८ इच्छुक उमेदवारांनी सोलापूर शहर भाजपाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. शहराच्या राजकीय इतिहासात यापूर्वी कधीही न पाहिलेली ही संख्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शहर भाजप कार्यालयातच घेतल्या जाणार असून, त्यानंतर सर्व अर्ज व सविस्तर अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी अर्ज स्वीकारल्यानंतर दिली.
भाजपाकडे इच्छुक उमेदवारांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद अधोरेखित होत असली, तरी प्रत्यक्ष उमेदवारी निश्चित करताना अंतर्गत स्पर्धा, नाराजी आणि वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय दिग्गज व्यक्त करत आहेत.
एकंदरीत, भाजपासाठी ही संख्या ताकदीचे प्रतीक असली, तरी “एक जागा आणि अनेक दावेदार” हे गणित सोडवताना पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार, हे मात्र निश्चित…







