MH 13 NEWS NETWORK
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने सज्ज असल्याचे प्रतिपादन भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले. डफरीन चौकातील सारस्वत मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या भाजपच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी त्यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी नगरसेविका प्रा. मोहिनी पत्की, सरचिटणीस सुधा अळीमोरे, अंबादास बिंगी, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे, उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, साधना संगवे, नागेश सरगम यांची उपस्थिती होती.

शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, निवडणूक प्रचाराचे नियोजन, मेळावे, सभा, मतदार यादीविषयी मार्गदर्शन तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रणा या मध्यवर्ती कार्यालयातून राबवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात सुरू असलेली विकासाची गंगा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरात आणली आहे. त्यामुळे सोलापूरकरांचा भाजपावर विश्वास अधिक दृढ झाला आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजना, पक्षाची ध्येयधोरणे आणि विकासकामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू म्हणाले, सोलापूरच्या जनतेचा भाजपावर ठाम विश्वास आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाने ४९ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत तब्बल १,३०० इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली असून हा पक्षावरील विश्वासाचाच दाखला आहे. उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी झोकून देऊन काम करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रा. मोहिनी पत्की आणि श्रीनिवास दायमा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नागेश सरगम यांनी केले.
यावेळी चन्नवीर चिट्टे, शिवानंद पाटील, राम तडवळकर, बजरंग कुलकर्णी, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, श्रीहरी म्याकल, आनंद बिर्रु, रामेश्वरी बिर्रु यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.








