MH 13 NEWS NETWORK

सोलापूर-पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ आज सायंकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले.

सोलापूरहून पुण्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या व्हॅगनार कार (क्रमांक MH 12 XQ 8753) च्या पुढील टायरचा स्फोट झाल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन बेंगळुरूहून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली.

या अपघातात कारचालकाच्या शेजारी बसलेल्या सौ. रत्ना राजेंद्र परमाणी (वय ६५, रा. पुणे) या गंभीर जखमी झाल्या असून अन्य चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना शेटफळ ग्रामीण रुग्णालयातून १०८ शासकीय रुग्णवाहिकेच्या मदतीने (डॉ. प्रदीप पाटील व चालक सिद्धेश्वर राऊत) सोलापूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक, रुग्णवाहिका पथक तसेच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी PSI उमेश पवार व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली.
या अपघाताची नोंद मोहोळ पोलिस स्टेशनच्या अपघात विभागात करण्यात आली असून पुढील तपास अधिकारी श्री. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक प्रमुख श्री. विजय साळुंखे यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली.









