MH 13News Network
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विशेष अधिवेशनानंतर मराठा आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज बुधवारी मराठा समन्वयकांची तातडीची विशेष बैठक आयोजित केली असून राज्यातील मराठा समन्वयक अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेला आहे. आज राज्यातील मराठा आंदोलनाची दिशा ठरेल असे चित्र निर्माण झाले आहे.
मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाखों मराठा समाजबांधवांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे आंदोलनस्थळी येऊन कुणबी प्रमाणपत्र बाबत अधिसूचना दिली. तसेच लवकरच अध्यादेश काढून सगेसोयरे यांचा समावेश कुणबी प्रमाणपत्र बाबत करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं. यावेळी मराठा आरक्षणावर तोडगा निघणार असल्याचं आश्वासन मिळाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान,10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला.त्यामुळे सरकारवर दबावतंत्राचा वापर केला गेला. परंतु सरकारने फसवणूक केल्याची भावना जरांगे पाटील व मराठा समाजामध्ये विशेष अधिवेशनात घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण झाली.यावर काही जिल्ह्यांमध्ये आंदोलने, निदर्शने करण्यात आली.
सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदे- फडणवीस सरकारने फसवणूक करून समाजाला गाजर दाखवले, त्यामुळे गाजर दाखवून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं. मोठ्या प्रमाणावर समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाला आणि यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
मनोज जरांगे पाटलांच्या वतीने संपूर्ण राज्यातील मराठा समन्वयकांची तातडीची बैठक आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समन्वयक अंतरवाली सराटीच्या दिशेने निघाला आहे. आज मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याचे स्पष्ट होत आहे.