MH 13 NEWS NETWORK
राजीव नगर सभेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद; भाजप उमेदवारांसाठी उत्स्फूर्त पाठिंबा
सोलापूर : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ११ मधील राजीव नगर परिसरात झालेल्या जाहीर सभेत आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांच्या भरीव विकासाच्या अभिवचनांनी नागरिकांची मने जिंकली. लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या या भागात झालेल्या सभेला नागरिकांची मोठी गर्दी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा यासाठी १२ कोटी रुपयांची कामे मंजूर असून त्यातील ९ कोटी रुपयांची कामे प्रत्यक्ष सुरू असल्याची माहिती देत दोन्ही आमदारांनी भविष्यातही प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा शब्द दिला. या घोषणेमुळे सभास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह संचारला.

यावेळी व्यासपीठावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर तसेच भाजप उमेदवार युवराज सरवदे, शारदाबाई रामपुरे, मीनाक्षी कडगंची, अजय पोन्नम, राजकुमार हंचाटे, प्रकाश म्हंता, गणेश चवरे उपस्थित होते.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कन्नड भाषेत नागरिकांशी थेट संवाद साधत सोलापूर शहरातील विकासाचा आढावा मांडला. शहरात विमानसेवा, आयटी पार्क, समांतर जलवाहिनी आणि ८९२ कोटींची समतोल पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपाच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहर मध्य मतदारसंघासाठी १४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत काँग्रेसवर जोरदार टीका केली. “१५ वर्षांत काँग्रेस आमदारांना एवढा निधी मिळाला नाही. खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रभाग ११ साठी ९० लाख तरी दिले आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“आपण संघटित राहिलो तर अंगणातील तुळस आणि देवळावरील कळस सुरक्षित राहील. एमआयएमसारख्या पक्षांना डोक्यावर बसवणे सोलापूरकरांना परवडणारे नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.








