mh 13 news network
हरीभाई देवकरण मैदानावर 50 फूट स्टेज, भगवा पडदा, हजारोंच्या बैठकीची व्यवस्था

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 10) होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा या निवडणुकीतील निर्णायक टर्निंग पॉईंट ठरेल, असा ठाम विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. ना. गोरे यांनी आज शुक्रवारी सभास्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट ठेवून सर्व २६ प्रभागांमध्ये १०२ उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी साडेबारा वाजता हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सभास्थळाची पाहणी करताना सांगितले की, “सोलापूरकरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरला पाणीपुरवठ्याची नवीन पाईपलाईन, विमानसेवा, आयटी पार्क यासारख्या अनेक महत्त्वाच्या योजना मिळाल्या आहेत. भविष्यातही देवभाऊ सोलापूरसाठी मोठ्या विकास योजना आणणार आहेत. त्यामुळे त्यांची ही सभा निवडणुकीची दिशा बदलणारी ठरेल.”
या पाहणीवेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, बिज्जू प्रधाने, विजय कुलथे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस सोलापूरकरांशी काय संवाद साधणार, कोणत्या मोठ्या घोषणा करणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.








