मराठा आंदोलकांसाठी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून अन्नछत्र
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी अन्नछत्र आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू असून, पावसामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या त्यातच प्रशासनाकडून मूलभूत सुविधांची मोठी कमतरता जाणवत आहे.आंदोलकांकडून सोशल मीडियावर टाकलेले पिण्याचे पाणी, शौचालय व जेवणाच्या गैरसोयीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

यामुळे बिकट परिस्थितीमुळे खचून न जाता अधिक संख्येने मराठा समाज या आंदोलनामध्ये जोडला गेला आहे. लाईटची व्यवस्था नसणे, आंदोलन परिसरातील हॉटेल आणि टपऱ्या बंद केल्या, स्वच्छतागृहांची, पाण्याची, कसलीच सोय नसल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहेत.

दरम्यान,या पार्श्वभूमीवर गावोगावी आणि विविध ठिकाणांहून समाज बांधवांनी रेल्वे व गाड्यांद्वारे अन्नधान्य, पिण्याचे पाणी, रेनकोट यांचा पुरवठा सुरू केला आहे.याच वेळी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्या वतीने आंदोलकांसाठी आझाद मैदान परिसरात अन्नछत्र व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
“गरजेच्या वेळी धावून आलेला आपला माणूस हा खरी ताकद दाखवतो. सरकारकडून दबाव असूनही मराठा समाज जरंगे पाटलांसोबत ठामपणे उभा आहे. सतेज पाटील यांनी माणुसकीच्या नात्याने केलेल्या या कार्याची समाज नक्कीच दखल घेईल,” अशी प्रतिक्रिया सोलापूरहून आलेले आंदोलक महेश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.