mh 13news network
सोलापूर – (प्रतिनिधी)
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी न पडता आपल्या-आपल्या प्रभागात फिरून प्रत्येक घर पिंजून काढावे. जनतेशी थेट संवाद साधत पक्षाने केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवावीत. सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध विकासकामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. आपण स्वतः पालकमंत्री असताना शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ही सर्व विकासकामे मतदारांच्या घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर आहे. केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवल्यास विजय निश्चित आहे.
कोण काय बोलत आहे, कोण काय अपप्रचार करत आहे याकडे दुर्लक्ष करा. प्रचार-अपप्रचाराला बळी न पडता प्रभागात ठाण मांडून अहोरात्र काम करा. जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडले गेले तर निवडणूक जिंकणे अवघड नाही, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, तौफिक शेख, हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








