सोलापूर (दि. २६ जुलै) – अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात दर्ग्याच्या कंपाउंडचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
गु.र. नं. १३७४/२०२५ अन्वये या घटनेतील संशयित आरोपी देवेंद्र काशीनाथा जकापूरे, अजय मलकप्पा जग्गे व गौरिशंकर सुभाष दमामी (सर्व रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) यांच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात १६ जुलै २०२५ रोजी कलम ३२४(४), २९९, २९८, १(५) BNS संहितेनुसार म्हणजेच भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी अख्तर चाँद मुजावर यांच्या तक्रारीनुसार, १५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता काही व्यक्तींनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देत दर्ग्याच्या लोखंडी कंपाउंडचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
हा प्रकार गावातील मुस्लिम समाजातील काही युवकांनी शिवाजी महाराजांचा विडंबन व्हिडिओ व्हायरल केल्याच्या पार्श्वभूमीवर घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी संशयित आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. सरकारी पक्षाने त्यास तीव्र हरकत घेतली, मात्र आरोपींकडून युक्तीवाद करताना “गुन्ह्यात कस्टडीची आवश्यकता नाही, आरोपी तपासास सहकार्य करण्यास तयार आहेत, आणि सदर गुन्हा जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र नाही,” असे नमूद करण्यात आले.

या युक्तीवादास मान्यता देत मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.मनोज एस. शर्मा यांनी प्रत्येकी २५,००० रुपये जातमुचलक्यावर, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक रविवारी पोलिस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणी अॅड. हेमंतकुमार आनंद साका यांनी आरोपींचे, तर अॅड. कुरूडकर यांनी सरकारी पक्षाचे प्रतिनिधित्व केले.