MH 13News Network
सोलापूर : ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. या पिकांचे पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांची भेट घेत प्रत्यक्ष निवेदनाद्वारे केली होती. आता या नुकसानीची भरपाई शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी दिलीप माने यांचे आभार मानले.
ऑक्टोबर- नोव्हेबर २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यात ५४ हजार ७१५ शेतकऱ्यांचे तूर, मुग, उडीद, भुईमुग, कांदा इ. पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. यातील ९१७ शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळाली. पण ९० टक्केहून अधिक शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित होते. वर्ष झाले तरी याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती.
शेतकऱ्यांचा हा प्रश्न दिलीप माने यांनी उचलून धरला. माने यांनी दक्षिणमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांची भेट घेत त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यात त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी महसूल, कृषी विभागाची संयुक्त बैठक घेत नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलली. अखेर बुधवार पासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्यांनी आनंदित होऊन नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्याचे एसएमएस दिलीप माने यांना पाठवून आनंद व्यक्त केला आणि आभार मानले.
शेतकरी समाजाचा कणा, मी कायम शेतकऱ्यांसोबत – माने
शेतकऱ्यांसाठी तळमळीने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. पावसामुळे २०२३ मध्ये शेतीची झालेली नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने अनेक शेतकरी चिंतेत होते. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्यांना मिळणारे हे मोठे यश अतिशय समाधान देऊन जाणारे आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम आणि आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहिल्यावर माझे झटणे, लढणे सार्थकी लागले याचा खूप आनंद आहे. शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे आणि त्यांना न्याय मिळवून द्यायला मी कायम त्यांच्यासोबत उभा आहे.